अमृतकण | मी तुला काय देऊ?

अरुण गोखले
भगवद्गीतेच्या 12 व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनास भक्तियोगाचे मर्म समजावून देतात. नव विधा भक्तीचे प्रकार समजावून देतात. देव आणि भक्त ह्याच्यातले अतूट कसे जोडायला हवे. त्याची गरज काय हेही समजावून सांगतात.
तेव्हा अर्जुनाने भगवंतास एक फार सुरेख असा प्रश्न विचारलेला आहे. तो विचारतो की हे माधवा! तुझी प्राप्ती होण्यासाठी आम्ही तुला काय द्यावे? म्हणजे तू आम्हास प्राप्त होशील?”
त्यावर स्मित हास्य करीत भगवान अर्जुनास म्हणाले, बा अर्जुना! अरे मी म्हणजे कोणती बाजारी वस्तू आहे का? की जी विकत घेता येईल?
माझ्या प्राप्तीसाठी सर्वसंग परित्याग, सर्वस्वाचे समर्पण हे करावे लागते. जगातल्या कोणत्याही मौल्यवान वस्तूच्या मोबदल्यात कोणीही मला विकत घेऊ शकत नाही. आपलासा करू शकत नाही. मी सहजासहजी कोणाच्याही हातात न गवसणारा वारा, हातात न टिकून राहणारा पारा, धरू म्हणता हाती न येणारा आणि शोधू म्हणता शोधूनही न सापडणारा आहे.
माझा शोध हा डोळे उघडून नाही तर मिटून करावा लागतो. मला बाह्यजगात नाही तर अंतरीच्या गाभाऱ्यात पाहावे लागते. ज्ञान दीपाच्या उजेडात माझी वाट शोधत यावे लागते. जो कोणी हा असा शोध घेतो त्यालाच मी बहुभाग्याने आणि नामस्मरणाच्या पुण्याईच्या बळावर सापडतो, दिसतो पण गवसतो असे नाही.
दुसरी गोष्ट अशी की तुझ्या म्हणण्याप्रमाणे तू मला काय देऊ केलेस तर ते मला आवडते, असे तू विचारले होय ना? तर त्याचे उत्तर असे की पत्र पुष्प फल तोय यातले जे काही तुला देता येणे शक्य असेल ते तू मला दे. तेही मला हवे असते म्हणून नाही तर तुझी देण्याची इच्छा आहे म्हणून. पण खरं सांगू का? बा अर्जुना!
माझ्या भक्तांच्याकडे त्यांची स्वत:ची अशी एकच गोष्ट असते ती म्हणजे त्यांचे मन. त्यांनी मनोभावे मला काहीही अर्पण केले तरी मी संतोष पावतो. अर्जुना! अरे इतकेच नाही तर दोन हात आणि मस्तकही हे अनन्य शरंगत भावे मला अर्पण करतात ना? त्यांच्या भक्तीचा मी जन्मोजन्मी ऋणी असतो. तेव्हा मला द्यायचंच असेल तर फक्त तुझे मन दे. मी वस्तूंचा नाही, शुद्ध भक्तीचा भुकेला आहे.





