“पंढरी समीप, वैष्णवांमध्ये उत्साह”; ‘माऊली माऊलीं’च्या जयघोषात अश्वांवर खारीक, बुक्याची उधळण

पंढरपूर – पंढरी समीप आल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. वाटचालीत पावसाने पुन्हा दडी मारली असली आणि उकाड्याने हैराण झाले असले तरी त्यांचा उत्साह मात्र कायम आहे. खरीप हंगाम वाया गेला असला तरी पिण्याच्या पाण्याची मात्र सोय होईल अशी आशा आता वारकरी बाळगून आहेत. आषाढी वारी म्हणजे विठ्ठल चरणी आपली आशा व्यक्त करण्याचाच दिवस असल्याने वारकऱ्यांच्या इच्छा, आकांक्षा विठुराया पूर्ण करेल अशी खात्री वारकऱ्यांना आहे.
भंडीशेगांव मुक्कामी पहाटे माऊ लींची विधीवत पूजा सोहळा प्रमुख ऍड. विकास ढगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. दिवसभर माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. कांदेनवमीच्या निमित्ताने पालखी तळावर वाल्हेकरांच्या दिंडीमध्ये कांदेनवमी साजरी करण्यात आली. पालखी सोहळ्यात वाल्हेकरांना समाजआरतीच्यावेळी पंख्याचा मान असतो.
वाल्ह्याचे अभियंते कृष्णाजी भगवंत मांडके यांनी निरा नदीवर स्वखर्चाने पुल बांधून माऊलींचा पालखी सोहळा जेजूरी, वाल्हे मार्गे लोणंदला नेला. त्या सेवेप्रित्यर्थ माऊलींना आरतीवेळेस वारा घालण्याचा मान मांडके यांना देण्यात आला आहे. त्यांच्यावतीने पालखी तळावर कांदेनवमी साजरी केली जाते. दुपारचे भोजन घेवून हा सोहळा शेवटच्या वाखरी मुक्कामाकडे मार्गस्थ झाला.
भंडीशेगांव येथे नवीन उड्डाण पूल झाल्याने व पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत केल्याने वाहतूकीत कोठेही अडचण आली नाही. दुपारी 2.30 वाजता हा सोहळा बाजीराव विहीर येथे उभ्या रिंगणासाठी पोहोचला. चोपदारांनी रस्त्यावरच उभे रिंगण लावून घेतले. दुपारी 3.30 वाजता अश्व धावण्यासाठी सोडण्यात आले. पुढे माऊलीचा अश्व तर मागे स्वाराचा अश्व धावत होता.
टाळ मृदंगाच्या गजरात माऊली। माऊली।। नामाचा अखंड जयघोष सुरू होता. अश्वांनी धावत जावून माऊलींना एक प्रदक्षणा पूर्ण करीत रथामागे 20 दिंड्यांपर्यंत गेला. त्यानंतर पुन्हा रथाजवळ येवून माऊलींचे दर्शन घेतले. नारळ, प्रसाद घेवून पुन्हा तो पंढरीच्या दिशेने धावत आला. यावेळी पुंडलिक वरदा, हरि विठ्ठल असा जयघोष वैष्णवांनी केला. उभ्या रिंगणाचा सोहळा संपल्यानंतर गोल रिंगणासाठी हा सोहळा रस्त्यालगतच्या मैदानात पोहोचला.
उभ्या रिंगणानंतर बाजीराव विहिरीजवळ पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोल रिंगण तयार करण्यात आले. या आखीव रेखीव गोल रिंगणात चार वाजता माऊलींची पालखी आली. पालखीने रिंगणाला एक प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यानंतर श्रीमंत उर्जितसिंह शितोळे व महादजीराजे शितोळे सरकार यांनी रिंगणाची पाहणी केली. भोपळे दिंडीच्या वारकऱ्यांने जरीपटक्याच्या ध्वजासह पाच रिंगण पूर्ण केले. त्यानंतर दोन्ही अश्व रिंगणासाठी तयार झाले.
सुरूवातीला माऊलींचा व स्वाराचा अश्व रिंगणाच्या मध्यभागी आणण्यात आला. ढगाळ वातावरणात स्वाराच्या अश्वासह माऊलींच्या अश्वाने लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत नेत्रदीपक दौड करून 3 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. यावेळी उपस्थितीत भाविकांनी माऊली। माऊली।। नामाचा जयघोष करीत अश्वांवर खारीक, बुक्याची उधळण केली. रिंगण सोहळ्यानंतर दिंड्यादिंड्यामध्ये उडीचे खेळ रंगले. उडीच्या खेळानंतर हा सोहळा वाखरीकडे मार्गस्थ झाला. समाज आरतीनंतर तो वाखरीत विसावला.
आज पालख्या पंढरीत
सर्व संतांना पुढे करून सर्वात शेवटी बुधवारी (दि. 28) दुपारी 1 वाजता माऊलींची पालखी वाखरीतून पंढरपूरकडे विठ्ठलाच्या भेटीसाठी मार्गस्थ होणार आहे. विसावा पादुका येथे पालखी सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण होणार आहे. त्यानंतर आरती होईल. माऊलींच्या पादुका या श्रीमंत ऊर्जीतसिंह शितोळे सरकार यांच्या गळ्यात दिल्या जातील व त्या पंढरपूरातील ज्ञानेश्वर मंदिरात नेल्या जातील. श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज आदी संतांच्या पालखी सोहळ्यासमवेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुमारे सात लाख वारकरी वाखरीत दाखल झाले आहेत.





