दिल्लीतील NDA च्या बैठकीला अजित पवारांची दांडी ; राजकीय वर्तुळात खळबळ

NDA meeting । लोकसभेच्या निकालानानंतर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. समोर आलेला निकाल केंद्रातील मोदी सरकारला धक्का देणारा असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या निकालानंतर आज दिल्लीत खलबतं होणार आहे. दिल्लीत एनडीए आणि इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. एनडीएलला बहुमत मिळाल्यानंतर सत्तास्थापनेसाठी पुढील रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत आज बैठक होणार आहे. या बैठकीला एनडीएचे घटक पक्षही उपस्थित राहणार आहेत. परंतु, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीला जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल या बैठकीला हजर राहणार आहेत.
बहुमत मिळाल्यानंतर आज दिल्लीत एनडीए पुढची रणनीती आखणार आहे. सत्तास्थापनेपूर्वी एनडीएच्या घटक पक्षांची महत्त्वाची बैठक झाली. सर्व खासदारांना दिल्लीतील बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्यात. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या सर्व विजयी खासदारांव्यतिरिक्त घटक पक्षांच्या खासदारांना सकाळी दिल्लीला पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. NDA, TDP, JDU, HAM, LJP, RLD, JDS, जनसेना या सर्व घटक पक्षांशी बोलणी झाली आहेत. आजच्या NDA बैठकीत सरकार स्थापनेची ब्लू प्रिंट तयार होईल. आगामी सरकारमध्ये सर्व मित्रपक्षांना मानाचे स्थान दिले जाईल, खुद्द पंतप्रधान सर्व पक्षांच्या प्रमुखांचे विजयाबद्दल अभिनंदन करणार आहेत.
इंडिया आघाडीचीही दिल्लीत आज महत्त्वाची बैठक NDA meeting ।
दुसरीकडे चमकदार कामगिरी करणाऱ्या इंडिया आघाडीचीही दिल्लीत आज महत्त्वाची बैठक होणार आहे. इंडिया आघाडीला एकूण 232 जागा मिळाल्यात यानंतर आता पुढची रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत ही महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला राज्यातील महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहे. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत आणि अरविंद सावंत या बैठकीला जाणार आहेत. तर शरद पवारही या बैठकीला हजर राहणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंत्रिपरिषदेची बैठक NDA meeting ।
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीला कपिल पाटील, भारती पवार, भागवत कराड उपस्थित राहणार का, याकडे लक्ष आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंत्रिपरिषदेची बैठक आज दुपारी 12 वाजता होणार आहे, पंतप्रधान मोदी ही बैठक घेणार आहेत. वर्तमान मंत्र्यांची ही शेवटची मंत्रिमंडळ बैठक असणार आहे. लोककल्याण मार्गावरील पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे.





