पुणे जिल्हा | राष्ट्रवादीची खेडमधील महिला आघाडी स्ट्राँग

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसची खेड तालुक्यातील महिला आघाडी खूप स्ट्राँग आहे, आईशपथ खूप स्ट्राँग आहे. त्यांच्या माध्यमातून तालुका ढवळून काढला आहे.
तालुक्यात पैठणीचे 7 आणि मंगळागौरीचे 17 असे 24 कार्यक्रम घेतले. त्यामध्ये तालुक्यातील 1 लाख 10 हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला आहे, असे प्रतिपादन खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले.
आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा जनसंवाद दौरा सोमवारी (दि. 7) तालुक्यातील मांजरेवाडी, होलेवाडी, टाकळकरवाडी, राक्षेवाडी, ढोरेभांबुरवाडी, वरची भांबुरवाडी, तुकाईवाडी, जैदवाडी येथे झाला. या दौर्यात आमदार मोहिते पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन झाले.
जनसंवाद दौर्यात राक्षेवाडी येथे नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा कांचन ढमाले, तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, तालुका महिला अध्यक्षा संध्या जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्या मंगल चांभारे,
खेड बाजार समितीचे अध्यक्ष कैलास लिंभोरे, माजी अध्यक्ष शांताराम चव्हाण, विनायक घुमटकर, संचालक जयसिंग भोगाडे, हनुमंत कड, पप्पू टोपे, रणजित गाडे, कमल कड, युवक तालुका अध्यक्ष जयसिंग दरेकर, पस माजी सभापती सुरेश शिंदे, माजी उपसभापती सतीश राक्षे,
वैशाली जाधव, अॅड.मनीषा टाकळकर, मछिंद्र राक्षे, पप्पू राक्षे, विजय थिगळे, राम गोरे, अमोल सांडभोर, वैभव नाईकरे, मंगल जाधव, बेबी कड, सुजाता पाचपिंड, मीना कोतवाल यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले, दसर्यानंतर आचार संहिता लागणार आहे. त्यामुळे तालुक्यात जनसंवाद दौर्याचे आयोजन करून विविध विकास कामाचे भूमिपूजन उदघाटन केली जात आहेत. जो मदत करतो त्याच्या मागे आपण गेलो पाहिजे.
अजित पवार पुन्हा सत्तेत आले तर लाडकी बहीण ही योजना सुरू राहील त्यासाठी सगळ्यां महिलांची साथ हवी आहे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश राक्षे यांनी, सूत्रसंचालन उत्तम राक्षे यांनी तर मच्छिंद्र राक्षे यांनी आभार मानले.
शिवराजच्या नोकरीचा प्रश्न मार्गी लावला जाईल
माझ्या तालुक्यातील मुलगा कुस्तीमध्ये नाव कमावतो. डबल महाराष्ट्र केसरी होतो. त्या शिवराज राक्षे याचा मला आणि तालुक्याला अभिमान आहे.
त्याच्या मागे उभे राहणे माझे कर्तव्य आहे. त्याच्या सत्काराचा कार्यक्रम घाईत घेतला. गावातील काही जणांना घाई झाली होती.
त्या कार्यक्रमासाठी मी शरद पवार यांना आणणार होतो. मात्र घाई केल्याने अजित पवार यांना आणले. शिवराज राक्षे याला मोठी मदत मिळवून देण्याचा प्रयत्न होता.
मात्र भरीव बक्षिसे त्यावेळी मिळाली नाहीत.आता त्याच्या नोकरीत अडचणी आहेत मात्र त्या अडचणी क्रीडा आयुक्तांशी चर्चा करून सोडवण्यात येतील शिवराजच्या नोकरीचा प्रश्न मार्गी लावला जाईल.





