पुणे जिल्हा | उत्तम खेळ करणार्या खेळाडूचे देशात कौतुक

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – उत्तम खेळ करणार्या खेळाडूचे देशात कौतुक होत आहे. कबड्डी खेळाला महत्व प्राप्त झाले आह, असे प्रतिपादन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे जिल्हा कबड्डी अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, खेड तालुका क्रीडा अधिकारी,
खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटना आणि रत्नाई महाविद्यालय राजगुरूनगर यांच्या माध्यमातून 14 वर्षांखालील मुलींच्या राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे सोमवारी (दि. 14) आयोजन येथील रत्नाई महाविद्यालयाच्या मैदानात केले होते, या स्पर्धेचे उद्घाटन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते खेळाडूंना मार्गदर्शन करताना बोलत होते.
याप्रसंगी क्रीडा विभागाचे उपसंचालक युवराज नाईक,जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक अरुण चांभारे, जिल्हा क्रीडाधिकारी महादेव कसगावडे, उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार ज्योती देवरे, जिल्हा सह क्रीडाधिकारी दादासाहेब देवकाते, अजय पवार, मेघाली म्हसकर,
ज्ञानेश्वर खुरंगे, निखील बुदीले, राजकुमार राऊत, रामदास रेटवडे, नितीन वरकड, शरद दुर्गे, जितेंद्र थिटे, प्राचार्य सुनील पवार, सुनील सुपनर, पंच प्रमुख दीपक धावटे, सुनील पवार,
मनीषा टाकळकर यांच्यासह मोठ्या संख्येने राज्यातील विविध जिल्ह्यातील कबड्डी संघातील खेळाडू, मार्गदर्शक शिक्षक रत्नाई व विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार मोहिते पाटील म्हणाले की, जीवनातील हा चांगला क्षण आहे. कबड्डी खेळात मुलींना उत्तम मार्गदर्शन करणार्या शिक्षकांचे मोठे योगदान आहे.
14 वर्षांखालील मुलींना राज्य पातळीवर कबड्डी खेळण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. उद्याच्या काळात या मधून राष्ट्रीय कबड्डीपटू तयार होतील. खेड तालुक्याचा सर्वांगीण विकास केला आहे.
कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध केला. येथील हुतात्मा राजगुरू तालुका क्रीडा संकुलाला अनेक सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्याने खेळाडूंची गैरसतोय दूर केली.
विविध खेळ येथील मैदानात होतात. आपल्याला सरकार मदत करते म्हणून खेळाडूंनी त्याचा फायदा घेतला पाहिजे. उत्तम खेळ करणार्या खेळाडूचे देशात कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील मुले खेळाच्या माध्यमातून पुढे गेली आहेत. कबड्डीला हिंदुस्तानात बहुमान आहे.
या खेळाला प्रसिद्ध करण्याचे काम सरकारने आणि त्यासोबत प्रसिद्धीमाध्यमांनी केले आहे. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा खेड तालुक्यात होत असल्याने त्याचा अभिमान आहे, असे त्यांनी नमूद केले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण गटविकास अधिकारी अमोल जंगले, सूर्यकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी जीवन कोकणे, मंगल पांडे, दत्ता कळमकर, माणिक भोंगाडे महेंद्र गाढवे, गोकुळ भालेराव, प्रकाश पवार, संतोष झगडे आदी उपस्थित होते.
सर्धेतील विजेते
प्रथम (कोल्हापूर विभाग) : शंभु महादेव विद्यालय (म्हसवड, जि. सातारा), द्वितीय (पुणे विभाग) : क्रीडा प्रबोधिनी विद्यालय (नवनगर, निगडी, पुणे), तृतीय (नाशिक विभाग) : बीआरएच कन्या विद्यालय (मालेगाव, जि. नाशिक).





