भाजपाचं 1 मतही राष्ट्रवादीला मिळणार नाही, भाजपच्या ‘या’ नेत्याचे खळबळजनक वक्तव्य

लातूर : लोकसभेत राष्ट्रवादीने युतीधर्म पाळला नाही त्यामुळे आता विधानसभेला भाजपाचे एकही मत राष्ट्रवादीला मिळणार नाही असे वक्तव्य लातूर ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
नेमके काय म्हणाले दिलीप देशमुख ?
अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारासाठी काम केलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकही मत भाजपाला पडलं नाही. यामुळे भाजपाच्या उमेदवाराचा लोकसभेत पराभव झाला. अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मतदारसंघात आणण्यात आला आहे. मात्र निधी वाटपात भाजपाच्या कार्यकर्त्यांना डावललं गेलं. भाजपा म्हटलं की राष्ट्रवादी वाल्यांचं डोकं उठत होतं असे देशमुख म्हणाले. आता विधानसभेची निवडणूक आहे. भाजपाचे एकही मत राष्ट्रवादीचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांना पडणार नाही, आम्ही पडू देणार नाही अशी भूमिका भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी घेतली आहे.
दिलीप देशमुख यांच्या या वक्तवव्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातली दरी वाढण्याची शक्यता आहे. महायुतीतील नेत्यांनी एकमेकांविरुद्ध अशीच वक्तव्ये केली तर महायुतीमध्ये मोठा वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता महायुतीमधील वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





