Ajit Pawar : राष्ट्रवादी दिल्ली विधानसभा लढणार ! अजित पवारांचे संकेत, काय म्हणाले पाहा….

Ajit Pawar – राजधानी दिल्लीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात अजित पवारांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवारांसोबत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांनी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढण्याचेही संकेत दिले आहेत.
महायुतीच्या बैठकीपूर्वी अजित पवारांनी ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आपल्याला फारसे यश आले नाही. मात्र त्यात खचून न जाता आम्ही जोमाने विधानसभा निवडणुकीसाठी काम केले. आपले काही उमेदवारांनी 1 लाखांच्यावर मते मिळवत विजय मिळवला आहे.
ईव्हीएम मशीनवर काही लोक दोष देत आहेत, मात्र त्यात काही तथ्य नाही. यावर सर्वोच्च न्यायालयाने देखील स्पष्टीकरण दिले आहे. त्यात काही घोळ नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विरोधकांचे इतर काही राज्यात सरकार स्थापन झाले, त्यावेळी त्यांनी ईव्हीएमला दोष नाही दिले.
लोकांनी जो विश्वास दाखवला आहे, तो विश्वास आम्ही कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. महिलांनी देखील मोठ्या संख्येने मतदान केले असून त्यांच्यामुळे यश मिळाले असल्याचे देखील अजित पवार म्हणाले.
तरुण पिढीला संधी देणार !
प्रफुल्ल पटेलांशी चर्चा करताना अजून जोमाने काम करण्याचे ठरवले आहे. कारण आता आमची जबाबदारी देखील वाढली आहे. डिसेंबरच्या नंतर आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करणार आहोत. त्यात जबाबदारीचे वाटप केले जाईल. महिला तसेच आता तरुण पिढीला संधी देणार असल्याचे देखील अजित पवारांनी यावेळी सांगितले.





