महायुतीत राष्ट्रवादी नाराज? कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला नेत्यांची दांडी

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत सर्व काही आलबेल आहे अशी स्थिती राहिली नाही. निवडणुकीतून सपाटून मार खाल्ल्यानंतर एकमेकांकडे बोट दाखवण्यात येत आहे. त्यात अजित पवार गटाविरोधात भाजपकडून सुर लावला जात आहे. त्यात केंद्रीय मंत्रिमंडळातही राष्ट्रवादीला स्थान देण्यात आले नाही.
तसेच सुनेत्रा पवारांचा राज्यसभेचा अर्ज दाखल करतानाही महायुतीचे नेते दिसले नाहीत. आता आगामी अधिवेशनासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एकही नेता फिरकला नाही. त्यामुळे महायुतीत नक्की काय सुरू आहे याची जोरदार चर्चा राजकीय वर्तूळात सुरू आहे.
विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन होवू घातले आहे. त्यासाठी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या बैठकील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एकाही नेत्याने हजेरी लावली नाही. अजित पवार, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील पुण्यात होते.
राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याने इतक्या महत्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याने वेगवेगळ्या चर्चा मात्र राजकीय वर्तूळात केल्या जात आहेत. या बैठकीला विरोधपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ऑनलाईन हजेरी लावली होती. तशीच हजेरी राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही लावता आली असती. मात्र तसे झाले नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला गैरहजर होते. याबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. बैठकीला ते येणार नव्हते याची कल्पना आपल्याला होती. बैठकीला गैरहजर राहण्याची परवानगी त्यांनी मागितली होती, असे नार्वेकर म्हणाले.
दरम्यान, पावसाळी अधिवेश हे दोन आठवड्यांचे होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं आहे. त्यामुळे काँग्रेस, शरद पवार आणि ठाकरे गटाचे नेते आता आक्रमक झाले आहेत. आगामी अधिवेशनात ते सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतील हे निश्चित आहे.
त्याची झलक कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत दिसून आली. विधानसभा निवडणुकी आधी हे शेवटचे अधिवेशन आहे. त्यामुळे या शेवटच्या अधिवेशनात सरकारची कोंडी करण्याची ही विरोधकांकडे संधी आहे. तर विरोधकांनाही जशाच तसे उत्तर देण्यासाठी हे अधिवेशन महत्वाचे आहे.





