‘…तर भाजपा 20 जागांच्या वर देखील गेली नसती’, दिल्लीच्या निकालावर रोहित पवारांचे भाष्य, म्हणाले…

Delhi Election Results 2025: माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत जबरदस्त हार पत्करावी लागली. स्वतः केजरीवाल यांचा पराभव झाल्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड निराशा दिसून येत आहे. तर तब्बल 27 वर्षानंतर भाजप पुन्हा दिल्लीत सत्तेत येणार आहे. जनतेचा हा निर्णय आम्ही नम्रपणे स्विकारतो, अशी प्रतिक्रिया या पराभवावर केजरीवाल यांनी दिली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी देखील भाष्य केले आहे.
रोहित पवार यांनी दिल्लीतील आपच्या पराभवाचे गणित समजावून सांगितले आहे. सोबतच, एकीकडं विकास तर दुसऱ्या बाजूला सत्ता, संपत्ती आणि गुंडगिरी, या पर्यायात विकासाचा पराभव झाला, असेही ते म्हणाले.
इंडिया आघाडीतील पक्षांनी आपापले इगो बाजूला सारले नाहीत
या निकालावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल भाजपचे अभिनंदन! 15 हून अधिक ठिकाणी भाजपच्या विजयी उमेदवारांचे मताधिक्य तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने मिळवलेल्या मतापेक्षा खूप कमी आहे. ही सर्व आकडेवारी बघितली असता इंडिया आघाडी असती तर भाजपा 20 जागांच्या वर देखील गेली नसती.
‘दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या नेतृत्वात सरकार स्थापन व्हावे ही माझी व्यक्तिगत भावना होती. उचित-अनुचित अशा सर्व मार्गांचा वापर करून निवडणुका लढणाऱ्या भाजपासारख्या महाशक्ती विरोधात लढताना समान विचारधारा असलेल्या पक्षांनी एक-दोन पाऊल मागे-पुढे घेण्याची गरज होती, परंतु दुर्दैवाने इंडिया आघाडीतील पक्षांनी आपापले इगो बाजूला सारले नाहीत, परिणामी अशक्य असणारी विजयश्री भाजपाने खेचून आणली. ही बाब ट्रॅडिशनल पद्धतीने लढणाऱ्या सर्व नेत्यांनी लक्षात घ्यायला हवी, असे मत देखील त्यांनी व्यक्त केली.
विकासाचा पराभव झाला
रोहित पवार एक्सवर (ट्विट) केलेल्या आणखी एका पोस्टमध्ये म्हणाले की, दिल्ली विधानसभेचा निकाल हा धक्कादायक आहे. आम आदमी पक्षाने आणि विशेषतः मनीष सिसोदिया साहेब यांच्यासारख्या निरलस व्यक्तीमत्त्वाने सामान्य माणसासाठी शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात देशात कुठंही झालं नाही असं डोंगराएवढं काम दिल्लीत उभं केलं. तरीही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागत असेल तर निवडणुकीच्या राजकारणातून विकास हद्दपारच होईल आणि नेतेही विकासकामं करणं सोडून केवळ द्वेषाचंच राजकारण आणि इव्हेंटबाजीच करतील की काय, याची भीती वाटते.
‘या निकालाने विकास करावा की नाही, असा प्रश्न पडला तर तो चुकीचा ठरणार नाही! एकीकडं विकास तर दुसऱ्या बाजूला सत्ता, संपत्ती आणि गुंडगिरी, या पर्यायात विकासाचा पराभव झाला आणि यामुळं सामान्य माणसालाच अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे, याचं अधिक दुःख वाटतं. असो! गेली दहा वर्षे मुख्यमंत्र्यांना अनेक अडथळ्याची शर्यत पार करावी लागली, पण आता किमान मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल हे पायात पाय न घालता हातात हात घालून काम करतील आणि जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करतील, ही अपेक्षा!’, असे ते म्हणाले.
दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला केवळ 22 जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपचे 48 उमेदवार निवडून आले आहेत. भाजप दिल्लीत जवळपास 27 वर्षानंतर सत्ता स्थापन करणार आहे.





