NCP Merger News – दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस भवितव्याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांना वरिष्ठ नेतृत्वाने स्पष्टपणे फेटाळून लावले आहे, दुसरीकडे आमदार सुनील शेळके यांनी मात्र विलीनकरणाच्या चर्चांना दुजारो दिला असल्याने पक्षातच एकमत नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. एका मुलाखतीदरम्यान बोलताना त्यांनी सांगितले की, दोन्ही पक्षांचे विलीनीकरण होणार नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. विलीनीकरणाची चर्चा थांबलेली नाही, ते होणारच. आम्ही सर्वजण या प्रक्रियेबाबत सकारात्मक आहोत, असे विधान शेळके यांनी केले आहे.प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यापूर्वीच विलीनीकरणाच्या चर्चांना नकार देत, अशी कोणतीही चर्चा पक्षपातळीवर झालेली नाही, अशी ठाम भूमिका मांडली होती. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वतंत्रपणे आपली संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर देत असल्याचे दिसत आहे. त्यानंतरही विलीनीकरण होणारच, असे आमदार शेळकेंकडून सांगितले जात आहे. या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. जयंत पाटील – सुनील तटकरे संघटना मजबूत करण्यावर भर अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी विलीनीकरण हाच पर्याय आहे, हा दावा पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी फेटाळून लावला आहे. उलटपक्षी, स्वतंत्र अस्तित्व राखून पक्ष अधिक मजबूत करण्याचा निर्धार नेतृत्वाने केल्याचे सांगण्यात येत आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या चर्चांपेक्षा संघटनात्मक काम, जनसंपर्क आणि आगामी राजकीय रणनीती यावर लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचेही पक्षश्रेष्ठींकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नेतृत्वाकडून स्पष्ट संदेश प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भूमिकेमुळे पक्षाची दिशा स्पष्ट झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वतंत्रपणे पुढे जाण्यास कटिबद्ध असल्याचे संकेत मिळत आहेत. विलीनीकरणाबाबत कोणताही निर्णय झाल्यास तो अधिकृतपणे जाहीर करण्यात येईल, मात्र सध्या तरी अशा कोणत्याही हालचाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एकंदरीत, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळापुरत्याच मर्यादित असून, पक्षपातळीवर त्याला कोणतीही अधिकृत मान्यता नाही. त्यामुळे विलीनीकरण अटळ असल्याचा दावा पक्ष नेतृत्वाने स्पष्टपणे फेटाळून लावला आहे.