Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या अपघात प्रकरणाला नवं वळण; DGCAकडून माहिती दडपली गेली? विमान कंपनीचं धक्कादायक कांड
Ajit Pawar Plane Crash : अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते, त्या 'व्हीएसआर व्हेंचर्स' कंपनीला युरोपियन हवाई नियामक संस्थाने 'ब्लॅकलिस्ट' केले होते, अशी माहिती समोर आली आहे.

Ajit Pawar Plane Crash Latest Update : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे.
ज्या ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ या खासगी विमान कंपनीच्या विमानातून अजित पवार प्रवास करत होते, त्या कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
युरोपियन हवाई नियामक संस्था EASA ने या कंपनीवर तब्बल एक वर्षापूर्वीच बंदी घातली होती. मात्र, असे असतानाही ही कंपनी भारतात उड्डाण सेवा कशी देत होती, यावरून आता DGCA यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
लेव्हल १’ सुरक्षा त्रुटी म्हणजे काय?
EASA च्या अहवालानुसार, व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीला ‘लेव्हल १’ या सर्वात गंभीर सुरक्षा श्रेणीत टाकण्यात आले होते. याचा अर्थ संबंधित कंपनीकडे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही विश्वासार्ह यंत्रणा नाही किंवा ती तपास यंत्रणांशी सहकार्य करत नाही. या गंभीर त्रुटींमुळे कंपनीचा ‘थर्ड कंट्री ऑपरेटर (TCO)’ परवाना निलंबित करण्यात आला होता.
२०२३ मधील अपघाताची माहिती दडपल्याचा आरोप
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, सप्टेंबर २०२३ मध्ये मुंबईत या कंपनीच्या ‘लिअरजेट ४५’ विमानाला अपघात झाला होता. या घटनेबाबत EASA ने वारंवार तांत्रिक अहवाल मागितला, मात्र कंपनीने तो सादर केला नाही.
ऑक्टोबर २०२३ ते नोव्हेंबर २०२४ दरम्यान EASA ने कंपनीला पाच वेळा नोटीस आणि स्मरणपत्रे पाठवली. तरीही कंपनीने अंतर्गत चौकशी अहवाल देण्यास नकार दिला, असा आरोप करण्यात आला आहे. या असहकार्यामुळेच युरोपियन युनियनने संबंधित कंपनीच्या विमानांवर युरोपियन हवाई क्षेत्रात पूर्ण बंदी घातली होती.
DGCAला माहिती असूनही परवानगी?
महत्त्वाची बाब म्हणजे, युरोपियन युनियनने या बंदीच्या आदेशाची प्रत भारताच्या DGCAकडे पाठवली होती. असे असताना महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी या कंपनीच्या विमानाला परवानगी कशी मिळाली, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. या संपूर्ण प्रकरणावर DGCAकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
तपास CIDकडे; ब्लॅक बॉक्स जप्त
गेल्या आठवड्यात बारामतीजवळ कोसळलेले विमानही याच वादग्रस्त कंपनीचे होते. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने या अपघाताचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवला आहे. तसेच केंद्रीय विमान अपघात तपास पथकाने (AAIB) विमानाचा ब्लॅक बॉक्स जप्त केला असून, त्यातील डेटाच्या आधारे अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.






