तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच NCERTने अभ्यासक्रम बदलला; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा दावा

नवी दिल्ली – एनसीईआरटीने 25 बाह्य तज्ञ आणि 16 शिक्षकांशी सल्लामसलत करून त्याचा अभ्यासक्रम बदलून तो अधिक तर्कसंगत करण्याचा प्रयत्न केला आहे असे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. शालेय पाठ्यक्रमातून मुघल, महात्मा गांधी, त्यांचा मारेकरी नथुराम गोडसे, हिंदू अतिरेकी आणि 2002 च्या गुजरात या विषयावरचा भाग काढून टाकण्यात आला होता. तसेच मौलाना आझाद यांच्या संबंधातील संदर्भही पाठ्यपुस्तकातून काढून टाकण्यात आला होता. त्यावर जोरदार टीका झाल्यानंतर शिक्षण मंत्रालयाने हे प्रतिपादन केले आहे.
पाठ्यपुस्तकातील हे बदल विषय अधिक तर्कसंगत करण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे. त्यात काही दुसरा हेतू नाही असेही या मंत्रालयाचे म्हणणे आहे. संबंधीतांशी चर्चा करूनच हा निर्णय झाला आहे. त्यात गुप्तपणे काहीं बदल करण्याचा संबंध नाहीं असेही त्यांनी म्हटले आहे. संसदेत या संबंधात जे प्रश्न विचारण्यात आले त्यात शिक्षण मंत्रालयाने ही भूमिका मांडली आहे. हे बदल करताना ज्या शिक्षकांशी किंवा तज्ज्ञांशी चर्चा केली गेली आहे त्यांची नावेही शिक्षण मंत्रालयाने दिली आहेत. या नावांमध्ये डॉ. अर्चना वर्मा, श्रृती मिश्रा, कृष्णा रंजन आणि सुनीलकुमार अदिंचा समावेश आहे.





