NCERT Book : आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा हटवल्याने वाद; वृषाली राजे भोसले आक्रमक
NCERT Book: 'इतिहास हा कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक दबावाखाली बदलला जाऊ नये'

NCERT Book : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (NCERT) इयत्ता आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा हटवण्यात आला आहे.
या निर्णयामुळे राज्यात संतापाची लाट उसळली असून शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मिडियावर देखील अनेकांनी याबाबत व्हिडिओ शेअर करत तीव्र नाराजी व्यक्त केली.
याप्रकरणी आता छत्रपती घराण्यातील वृषाली राजे भोसले आक्रमक झाल्या आहेत. मराठा साम्राज्य हा केवळ इतिहास नाही, तर तो आपल्या स्वाभिमानाचा, पराक्रमाचा आणि राष्ट्ररक्षणाच्या तेजस्वी परंपरेचा जिवंत वारसा आहे. या निर्णयाविरोधात कायदेशीर पावले उचलणार असल्याचा इशारा वृषालीराजे भोसले यांनी दिला आहे.
वृषालीराजे भोसलेंचा इशारा
इतिहास हा कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक दबावाखाली बदलला जाऊ नये. तो पुराव्यांच्या आधारे जसाच्या तसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. मराठ्यांच्या उत्तरेतील प्रभावाचा पुरावा देणारा नकाशा वगळणे हे ऐतिहासिक सत्याशी प्रतारणा करण्यासारखे आहे.
आम्ही वैयक्तिकरीत्या, तसेच छत्रपती घराण्याच्या वतीने या निर्णयाचा तीव्र निषेध करतो. सध्या आम्ही या संदर्भातील सर्व कायदेशीर बाबी तपासत आहोत. त्यानंतर पुढे योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. मूळ नकाशाला विरोध केल्यानंतर त्यात बदल करून काही तत्कालीन राजपूत राज्ये वगळण्यात आली. त्यासही विरोध करण्यात आल्यानंतर संपूर्ण नकाशाच काढून टाकण्यात आला.
अशा गौरवशाली आणि प्रेरणादायी इतिहासाचे प्रतिनिधित्व करणारे घटक अभ्यासक्रमातून कमी करणे किंवा हटवणे हे दुर्दैवी आहे. छत्रपती घराण्याची वंशज म्हणून मी या निर्णयाचा तीव्र निषेध करते. मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा अभ्यासक्रमात समाविष्ट होत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरू राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.
कोणत्याही दबावाखाली इतिहास बदलला जाऊ नये. अनेक राजपूत राजांनी मराठांचे साम्राज्य स्विकारले होते. ही वस्तूस्थिती आहे. ती कुणी ही बदलू शकत नाही. या प्रकरणी कायदेशीर बाबी तपासून पुढील पाऊल उचलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप
दरम्यान, राजस्थानातील रामपुरा मोहीम, बुंदीतील राजकीय हस्तक्षेप, कक्कोरचे घनघोर युद्ध आणि पाटण, मेर्टा येथील ऐतिहासिक विजय हे मराठ्यांच्या युद्धनीतीचे पुरावे आहेत. अनेक राजपूत राज्यांनी त्यावेळी मराठ्यांचे वर्चस्व मान्य केले होते. ही ऐतिहासिक वस्तूस्थिती असतानाही मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा वस्तुस्थिती असतानाही मराठा अभ्यासक्रमातून हटवणे म्हणजे जाणीवपूर्वक इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याची टीका होत आहे.
हेही वाचा:






