Nazare Dam: मल्हार सागर जलाशय ‘फुल्ल’! दुष्काळी पुरंदर तालुक्याची चिंता मिटली, शेतकरी सुखावला
Nazare Dam: धरणातील एकूण ७८८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा पूर्ण क्षमतेने भरल्याने प्रशासनाकडून नदीकाठच्या रहिवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन.

Nazare Dam – पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ होत आहे. पुरंदर तालुक्यातील (मल्हार सागर जलाशय) नाझरे धरणातील उपयुक्त पाणीसाठा १०० टक्के झाला आहे. पुरंदर तालुका हा तसा दुष्काळी पट्ट्यातील समजला जातो. तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीमुळे येथील नागरिकांना कायमच दुष्काळाचा सामना करावा लागतो. पावसामुळे आणि धरणाच्या पाणीसाठ्यात वाढीमुळे शेतकरी सुखावला आहे.
कऱ्हा नदीच्या पाण्याने नाझरे धरणात पाणीसाठा झाला आहे. परंतु धरणापासून खाली बारामती तालुक्यात जाणाऱ्या कऱ्हा नदीला ओढ्यानाल्यातून पाणी वाहत नसल्याचे चित्र आहे. नाझरे धरणाची (मल्हार सागर जलाशय) ७८८ दशलक्ष घनफूट पाणी साठ्याची क्षमता आहे. त्यापैकी २०० दशलक्ष घनफूट मृतसाठा असून तसेच सध्या नाझरे धरणातील पिण्यासाठी ७८८ दशलक्ष घनफूट गाळमिश्रित पाणीसाठा वापरासाठी उपलब्ध झाला आहे.
नाझरे धरणावर अवलंबून असलेल्या ६ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहेत. मोरगाव नळ प्रादेशिक योजना व १६ गावे असून नाझरे प्रादेशिक योजना व इतर ५ गावे आहेत. पारगाव माळशिरस व इतर २३ गावे अवलंबून आहेत. जेजुरी नगरपालिका पाणी पुरवठा योजना कार्यरत आहेत. इंडियन सिमलेस कंपनी जेजुरी एमआयडीसीत याच पाण्यावर अवलंबून आहे.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ जेजुरी आदींसाठी नाझरे धरणावरून पाणीपुरवठा केला जात आहे. या गावांच्या पाणीपुरवठा योजना आणि जेजुरी औद्योगिक वसाहतीत पाणी पुरवठा केला जात आहे. धरणातून शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. ३१५० हेक्टर शेतीचे क्षेत्र ओलिताखाली आहे. नाझरे धरणात पाणीसाठा वाढल्याने व लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
धरणाच्या परिसरात जून महिन्याच्या मध्यापासून तुरळक आणि मध्यम स्वरुपाच्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. धरणाच्या पाणीसाठ्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे दररोज ३ ते ४ टक्के पाणी साठ्यात वाढ होत आहे.
“पुरंदरच्या पश्चिम पट्ट्यात पावसाचे प्रमाण चांगले आहे. धरण १०० टक्के भरले असल्याने धरणातून होणारा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता असल्याने नदी काठावरील रहिवासी व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.”
– शाखा अभियंता, नाझरे धरण.






