सोक्षमोक्ष- नक्षलवाद: विकास हवा की अधोगती?

अशोक सुतार

नक्षलवादाचा झारखंड, पश्‍चिम बंगाल, ओडिशा, बिहार, छत्तीसगढ आणि आंध्र प्रदेश या भागांत मोठा प्रभाव आहे. देशातील 11 राज्यांतील 90 जिल्ह्यांत नक्षली चळवळ पसरली आहे. नक्षलवादी आणि प्रशासन यांच्या संघर्षात आतापर्यंत 6 हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या नक्षली चळवळीतील बंडखोरांच्या मते ते स्थानिक आदिवासींच्या हक्‍कासाठी आणि ज्या लोकांकडे सरकारने लक्ष दिले नाही अशा लोकांच्या हक्‍कासाठी लढत आहेत.

आजवर अनेक ठिकाणी झालेल्या नक्षली हल्ल्यात अनेक जवान आणि नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे नक्षलवादाचा प्रश्‍न देशासमोर “आ’ वासून उभा राहिला आहे. भारतात माओवादाची किंवा नक्षलवादाची सुरुवात पश्‍चिम बंगालमध्ये 1960 च्या दरम्यान झाली होती. माओवाद्यांना नक्षलवादी असेही म्हणतात. पश्‍चिम बंगालमधील नक्षलबारी गावात या भागात चारू मुजूमदार यांनी तेथील जमीनदारांविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनालाच पुढे नक्षलवाद असे म्हटले जाऊ लागले. 70 च्या दशकात या आंदोलनाने अत्यंत उग्र रूप धारण केले. त्यावेळी कनू संन्याल हेही मुजूमदार यांच्यासोबत होते.

जंगल परिसरात आदिवासी जमाती आहेत. त्यांच्या जमिनी जबरदस्तीने बळकावत काही जमीनदारांनी त्यांच्यावर अन्याय करणे सुरू केले होते. तेथील सामाजिक आणि आर्थिक विषमतेमुळे अराजकता माजली होती. त्याचा फायदा घेत काही संघटनांनी आपले समांतर सरकार सुरू केले. त्यातून नक्षलवादी चळवळीचा उदय झाला. या चळवळीला सुरुवातीला भूमिपुत्रांनी पाठिंबा दिला. परंतु आज हेच भूमिपुत्र नक्षलवाद्यांच्या त्रासाला कंटाळले आहेत. ही चळवळ दडपण्याचा पोलिसांकडून अनेकदा प्रयत्न झाला. गेल्या काही वर्षांत माओवाद्यांचे अनेक गट तयार झाले. मध्य भारतातील अनेक भागात त्यांनी आपले अस्तित्व प्रस्थापित केले आहे. या भागाला “रेड कॉरिडॉर’ असे म्हणतात. झारखंड, पश्‍चिम बंगाल, ओडिशा, बिहार, छत्तीसगढ आणि आंध्र प्रदेश या भागात या चळवळीचा मोठा प्रभाव आहे. देशातील 11 राज्यांतील 90 जिल्ह्यांत ही चळवळ पसरली आहे. नक्षलवादी आणि प्रशासन यांच्या संघर्षांत आतापर्यंत 6 हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या चळवळीतील बंडखोरांच्या मते ते स्थानिक आदिवासींच्या हक्‍कासाठी आणि ज्या लोकांकडे सरकारने लक्ष दिले नाही अशा लोकांच्या हक्‍कासाठी लढत आहेत.

नुकताच गडचिरोली येथील नक्षली हल्ल्यात 15 जवानांचा आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला. 24 एप्रिल 2017 रोजी सुकमा जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात 25 सीआरपीएफ जवानांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल झालेल्या हल्ल्यात 10 ते 12 माओवादी ठार झाले होते. 11 मार्च 2017 रोजी झालेल्या हल्ल्यात छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्यातील 12 जवानांचा मृत्यू झाला होता. 2 फेब्रुवारी 2017 रोजी झालेल्या माओवाद्यांच्या हल्ल्यात ओडिशा पोलिसांतील सात जवानांचा मृत्यू झाला होता. ही घटना कोरापूट भागात घडली होती. 19 जानेवारी 2016 मध्ये बिहारमधील औरंगाबाद भागात झालेल्या स्फोटात सीआरपीएफच्या कोब्रा पथकाचे दहा कमांडो मारले गेले. या हल्ल्यानंतर झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांचाही मृत्यू झाला होता. 2016 मध्ये एका भूसुरुंग स्फोटात सीआरपीएफच्या 7 जवानांचा मृत्यू झाला होता. 2015 मध्ये सुकमा विशेष कृती दलाच्या सात सदस्यांचा मृत्यू झाला आणि 10 लोक जखमी झाले होते.

2014 च्या फेब्रुवारी महिन्यात, दंतेवाडात पाच पोलिसांचा मृत्यू झाला होता. 2014 मध्येच गडचिरोलीत झालेल्या हल्ल्यात सात पोलिसांचा मृत्यू झाला आणि दोन पोलीस जखमी झाले होते. गेल्यावर्षी सी-60 पथकाने केलेल्या हल्ल्यात 37 माओवाद्यांचा मृत्यू झाला होता. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मध्यरात्री नक्षलवाद्यांनी कुरखेडा तालुक्‍यातील दादानगर गावाजवळ रस्त्याच्या बांधकामाची 36 वाहने पेटवून दिली होती. मध्यरात्री ही घटना घडली आणि सकाळ उजाडताच नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 जवान मारले गेले. नक्षलवाद्यांनी सापळाही रचला होता. नक्षलवाद्यांना पूर्ण कल्पना होती की, मोठ्या प्रमाणावर गाड्या पेटवल्यावर पोलीस आणि सुरक्षा दलाचा मोठा फौजफाटा येणार आहे. सकाळी घटनास्थळाकडे जाणाऱ्या जवानांनी भरलेल्या वाहनाला नक्षलवाद्यांनी भूसुरुंग लावून उडवले.

सध्या हा परिसर युद्धभूमी बनला आहे. नक्षलवादी आणि जवान असा दोन्ही बाजूंकडून संघर्ष सुरू आहे. यामुळे अनेक गावे रिकामी करण्यात आली आहेत. लोक भीतीमुळे गाव सोडून गेले आहेत. या भागात रस्त्याच्या बांधकामाला नक्षलवाद्यांचा विरोध होता. काही गावातल्या घरांवर माओवादींनी बॅनर लावले आहेत. याद्वारे त्यांनी रस्ते बांधणीला विरोध केला आहे. हा विरोध आम्ही आठवडाभर साजरा करत आहोत, असे त्यांनी फलक लावून म्हटले होते. गेल्या वर्षी महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 दलाने 40 नक्षलवाद्यांना ठार केले होते.

नक्षलवाद्यांचे नेमके प्रश्‍न काय आहेत, त्यांच्या मागण्या काय आहेत, याबद्दल राज्य सरकारने अनेकवेळा प्रयत्न केले. परंतु नक्षलवाद्यांनी आपला हेका सोडलेला नाही. स्थानिक आदिवासी नक्षलवाद्यांना विरोध करायला धजावत नाहीत. कारण जीवाचे मोल कोणाला नाही? खरे तर नक्षलवाद्यांना आदिवासी भागात विकास नको आहे. कारण राज्य सरकारने केलेली विकासकामे उदा. पूल, रस्ते, सरकारी दवाखाने, शाळा अशा बऱ्याच सुविधा नक्षलवाद्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न चालवला आहे. देशात लोकशाही आहे, हे नक्षलवाद्यांना पटत नाही. तर त्यांना एकाधिकारशाही निर्माण करायची आहे का, असा प्रश्‍न निर्माण होतो. कोणतीही चळवळ ही विकासासाठी असली पाहिजे; परंतु नक्षलवाद्यांना सर्वसामान्य जनतेचा विकास नको आहे. त्यामुळे त्यांना नेमके काय अपेक्षित आहे, विकास की अधोगती? याचा आता विचार करण्याची वेळ आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.