नवरात्री विशेष : कर्तव्यनिष्ठेतून जपली माणुसकीची भावना
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सविता पवार यांचे उल्लेखनीय कार्य

पिंपरी – नवरात्रीच्या पर्वात स्त्रीशक्तीचा जागर करताना समाजाप्रती आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडणाऱ्या महिलांचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे. छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सविता पवार यांनी रस्ता सुरक्षा आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे.
हिंजवडी येथे जागतिक रस्ता अपघात बळी स्मरण दिनानिमित्त लॉस्ट टॅलेंट संकल्पनेतून त्यांनी शांतता पदयात्रा काढून अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. समृद्धी महामार्गावरील तसेच ट्रॅक्टर-ट्रॉलीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी त्यांनी माहितीपट तयार केले, याशिवाय चार अॅनिमेशन फिल्म्स आणि दोन डॉक्युमेंटरींच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेची जनजागृती केली. त्यांच्या या कार्याची दखल घेत परिवहन आयुक्त कार्यालयाकडून त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
पवार यांना त्यांच्या सामाजिक आणि जनजागृतीपर कार्यासाठी कुसुमताई चव्हाण महिला भूषण, लोहा भूषण आणि राज्य मराठी पत्रकार संघाचा महिला भूषण पुरस्कार असे सन्मान प्राप्त झाले आहेत. तसेच विविध शाळा, महाविद्यालये आणि संस्थांनीही त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांना मदत करणे, रोटरी क्लबच्या माध्यमातून पाय गमावलेल्या व्यक्तींना जयपूर फूट मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणे आणि रेडिओ ९८.३ एफएमच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेचा संदेश देणे, असे विविध उपक्रम त्यांनी राबवले आहेत. वाहतूक नियमांचे पालन ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी असल्याचा संदेश देणाऱ्या सविता पवार यांचे कार्य नवरात्रीतील स्त्रीशक्ती, जिद्द आणि सेवाभावाचे प्रेरणादायी उदाहरण ठरते.
Podar School Bus : पोदार स्कूलची बस दुभाजकावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!





