Juni Sangvi : भय इथले संपत नाही? धग सांगवीच्या आगीची
Juni Sangvi : आगीमुळे सोसायटीचे मोठे नुकसान झाल्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे आश्वासन

पिंपरी-चिंचवड – जुनी सांगवी येथील करण-जयमाला सोसायटीतील निवासी सदनिकेत चालविल्या जाणाऱ्या गॅरेजमध्ये काही दिवसांपूर्वी (गुरुवार, १ ऑक्टोबर) लागलेल्या आगीची धग त्या परिसरात अजूनही जाणवत आहे. सोसायटीत राहणारे साडेतीनशेहून अधिक नागरिक अद्यापही कमालीच्या भयाच्या सावटाखाली जगत असल्याचे या प्रतिनिधीने त्या भागाला प्रत्यक्ष भेट दिली तेव्हा जाणवले.
याच सोसायटीत गॅरेज, स्पेअर पार्ट विक्रीची अशी चार दुकाने आणि एक दुचाकी खरेदी- विक्रीचे दुकान आहे. त्या भीषण आगीनंतर सोसायटीतील आपले वास्तव्य आता किती सुरक्षित, निर्धोक आहे, असा प्रश्न प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तरळत असल्याचे दिसत होते.
आगीच्या घटनेचा सांगवी पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनीच या आगीची नोंद घेत निष्काळजीपणा आणि रहिवाशांच्या जीवितास धोका ठरणारे वर्तन केल्याबद्दल गॅरेज मालकावर गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरमधील माहितीनुसार या आगीसंदर्भात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. याच बाबीमुळे आग लागून सोसायटी आणि रहिवाशांना मोठ्या आर्थिक, मानसिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
आग कशामुळे?
- वापरलेल्या, जळक्या तेलाचा दोन ड्रममध्ये साठा
- बॅटरी रिचार्जिंग यंत्रणा
- फ्रंट मार्जिनमध्ये टायर- ट्यूबची विक्री
- हवा भरण्यासाठी एअर कॉम्प्रेसर
धक्कादायक बाबी
- निवासी सदनिकेत बेकायदा गॅरेज
- अग्निशामक विभागाचा परवाना नाही
- विमा उतरवलेला नाही
- अतिक्रमण करून फ्लेक्स-प्लॅस्टिकची रस्त्यावर कॅनोपी
- फुटपाथावर उभारलेली हायड्रॉलिक जॅक
आमदारांचे आश्वासन
भीषण आगीने भेदरलेल्या रहिवाशांनी करण- जयमाला सोसायटीचे अध्यक्ष सुदाम प्रधान आणि अन्य पदाधिकाऱ्यांसमवेत भारतीय जनता पक्षाचे चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी सोसायटी आणि जळितग्रस्तांना शासकीय, अन्य मार्गाने सर्व मदत देण्याचे आश्वासन दिले. आगीमुळे सोसायटीचे मोठे नुकसान झाल्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे आश्वासन दिले.
बेकायदा गोष्टी बंद
स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ज्या गैर, बेकायदा बाबी आढळतील, त्या बंद करण्याचे आश्वासन त्यांनी दिले, तसेच निवासी सदनिकेत असलेले गॅरेज पुन्हा सुरू होणार नाही, असेही आश्वासन दिले. त्याचबरोबर पालिकेच्या सार्वजनिक जागेवर अतिक्रमण झाले असल्यास ते पूर्णपणे हटवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आमदारांनी दिलेल्या आश्वासनामुळे रहिवाशी आश्वस्त झाले असले, तरी या आश्वासनांची लवकरात लवकर अंमलबजावणी होऊन आम्हाला सुरक्षित, निर्धोक जीवन जगता यावे, अशा भावना यावेळी सोसायटीच्या चाळीस- पन्नास नागरिकांनी व्यक्त केल्या.
Unauthorized Constructions : अनधिकृत बांधकामांवर आता गुन्हे दाखल होणार; मालकांसह विकासकांवरही कारवाई





