Nagar | कोळाईदेवीच्या नवरात्र महोत्सवास सुरुवात…

श्रीगोंदा , (प्रतिनिधी): जिल्ह्यासह राज्यात प्रसिद्ध असलेल्या कोळगाव येथील श्री कोळाईदेवी मंदिरात विधिवत घटस्थापना करण्यात आली. नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरात नऊ दिवस धार्मिक कार्यक्रमांसोबत मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे भाविकांसाठी आयोजन केले असल्याची माहिती सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी दिली.
श्री कोळाईदेवी मंदिरात घटस्थापना करण्यात आली. घटस्थापनेच्या निमित्ताने मंदिरासह परिसरात सुशोभीकरण करण्यात आले.
पहाटे आरतीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी डांबरी रस्त्यापासून मंदिरापर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी दिव्यांची सोय करण्यात आली आहे.
मंदिर परिसरातील जमीन सपाट करून साफसफाई करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
या कार्यक्रमांमध्ये पहिल्या माळेला संदीप जाधव यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम, दुसऱ्या माळेला अभिनेता ओम यादव प्रस्तुत कॉमेडी तडका होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम,
तिसऱ्या माळेला विकास कर्डिले व बापू काळे यांचे दीपमाळ पाजळण्याचा कार्यक्रम व आराधी मंडळाचा कार्यक्रम, चौथ्या माळेला गायक नितीन निंबाळकर यांचा देवीचा जागर माता की चौकी कार्यक्रम, पाचव्या माळेला नवरात्र उत्सवानिमित्त दांडीयाचा कार्यक्रम,
सहाव्या माळीला दांडियाचा कार्यक्रम व गुरुताई महाराज जगताप यांचा देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम देवीचा कार्यक्रम, सातव्या माळेला दीपोत्सवाचा कार्यक्रम व गोदावरीताई मुंडे यांचा गवळणी आणि भजनाचा कार्यक्रम, आठव्या माळेला चला हवा येऊ द्या फेम जादूगर शिवम यांचा मनोरंजनात्मक कार्यक्रम, नवव्या माळेला श्री कोळाईदेवीचा होम आयोजित करण्यात आला आहे.
देवीचे पुजारी संतोष गुरव हे दर दिवशी वेगवेगळे अलंकार व वेशभूषा देवीसाठी करणार आहेत. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विलास शितोळे, नंदकुमार लगड, उल्हास नलगे, संभाजी लगड, सचिन डूबल, संतोष लगड ,प्रवीण करपे व इतर उपस्थित होते.





