IND vs AUS : ‘जर कोणाच्या बापात दम असेल, तर रोखून दाखवा…’, रोहित-विराटच्या भविष्याबाबत माजी खेळाडूच थेट आव्हान

Navjot Singh Sidhu statement : भारतीय क्रिकेट संघाचे दोन दिग्गज खेळाडू, रोहित शर्मा आणि विराट कोहली, सध्या त्यांच्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यावर असून त्यांच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. सध्या दोघेही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचा भाग आहेत. चाहते या दोन दिग्गजांना २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत खेळताना पाहू इच्छितात. दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी रोहित आणि विराटच्या भविष्याबाबत मोठे विधान केले असून, भारतीय निवड समितीला थेट आव्हान दिले आहे.
विराट-रोहित हिमालयासारखे उंच –
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना नवज्योत सिंग सिद्धू यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची तुलना हिमालय पर्वताशी केली. ते म्हणाले, “विराट कोहली जे काही करतो, त्यात त्याची छाप स्पष्ट दिसते. पण आजच्या तरुण खेळाडूंनी स्वतःची ओळख निर्माण करण्याऐवजी विराट आणि रोहित यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न केला आहे. सुमेरु पर्वताने जसे आपली जागा बदलली, तसे आता फक्त विराट आणि रोहितच आहेत. हे दोघे हिमालयासारखे उंच आणि अढळ आहेत.”
निवड समितीला खुलं आव्हान –
विराट आणि रोहित यांची तुलना सूर्याच्या तेजाशी करताना सिद्धू पुढे म्हणाले, “यापेक्षा मोठे दान काय असू शकते? ही पिढी जुनी झाली असली, तरी तिने सोन्यासारखी पिढी दिली आहे. सूर्याला आपले तेज सिद्ध करावे लागते का? त्याचा प्रकाशच त्याचा पुरावा आहे. विराट आणि रोहित यांनी जे काही केले आहे, ते ऐतिहासिक आहे.”
हेही वाचा – IND vs AUS : किंग कोहलीसमोर हिटमॅन नतमस्तक! रोहितने सलाम करताच विराटचे स्मितहास्य, पाहा VIDEO
भारतीय निवड समितीला उद्देशून सिद्धू यांनी सडेतोड आव्हान दिले. ते म्हणाले, “बदल हा नेहमीच प्रगती असेल असे नाही, पण जो बदल तुम्हाला अधिक चांगले करतो, तीच खरी प्रगती आहे. प्रगती हे जीवनाचे प्रतीक आहे आणि विकासाचे लक्षण आहे. जे भारतीय क्रिकेटचा विस्तार करतात, त्याला पुढे नेतात आणि सर्वोच्च बनवतात, त्यांना थांबवा. जर कोणाच्या बापात हिंमत असेल, तर रोहित आणि विराटला रोखून दाखवा.”
हेही वाचा – Indian Womens Team : भारतीय महिला संघाला आयसीसीचा दणका! ‘या’ कारणासाठी ठोठावला दंड
चाहत्यांमध्ये विराट-रोहितबद्दल उत्सुकता –
रोहित आणि विराट यांच्या निवृत्तीच्या चर्चांनी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. २०२७ चा विश्वचषक त्यांच्या कारकिर्दीचा शेवटचा टप्पा ठरेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सिद्धू यांच्या या विधानांमुळे निवड समितीवर दबाव वाढला असून, या दोन दिग्गजांचे भविष्य काय असेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.





