Navjot Singh Sidhu : ‘माझे निर्णय घेण्यास मी स्वतंत्र…’; नवज्योतसिंग सिद्धू यांची नाराजी कायम

Navjot Singh Sidhu – पंजाबमधील कॉंग्रेसचे महत्वाचे नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू अजूनही नाराज आहेत. त्यामुळे ते पक्षकार्यापासून आणि एकूणच सक्रिय राजकारणापासून तूर्त तरी दूरच आहेत.
सिद्धू यांना नुकतंच पत्रकारांनी सक्रिय होण्याविषयीचा प्रश्न विचारला. त्यावरील उत्तराचा चेंडू त्यांनी खुबीने पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात टोलवला. संबंधित प्रश्नाचे उत्तर मी नव्हे; पक्षश्रेष्ठीच देऊ शकतात. मी क्रिकेट खेळलो. समालोचन केले. प्रेरणादायी चर्चेत सहभागी झालो.
निवडणुका लढलो. टी.व्ही.शोही केले. त्यासाठी मला कुणावरच अवलंबून रहावे लागले नाही. त्यासाठीचे निर्णय घेण्यास मी स्वतंत्र होतो. मात्र, राजकीय पक्षांत श्रेष्ठी (हायकमांड) असतात. त्यांच्यावर अवलंबून रहावे लागते, अशी टिप्पणी त्यांनी केली.
पंजाबमध्ये अडीच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत कॉंग्रेसला सत्ता गमवावी लागली. त्या निवडणुकीआधी आणि निवडणुकीनंतरही सिद्धू यांचे पक्षाच्या पंजाबमधील नेत्यांबरोबरचे मतभेद कायम चव्हाट्यावर आले.
मागील काही महिन्यांपासून सिद्धू कॉंग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत नसल्याचे ठळकपणे दिसून आले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ते सहभागी झाले नाहीत. पंजाबमध्ये नुकतेच पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. त्या पोटनिवडणुकीपासूनही ते लांबच राहिले.




