Naveen Patnaik : भाजपकडून केवळ खाणमालकांच्या हितांचे रक्षण; नवीन पटनायक यांचा आरोप
सुधारित खाण कायद्यावरून बीजेडी अध्यक्ष नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांनी शुक्रवारी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. ओडिशातील सत्ताधारी भाजप लोकांच्या हक्कांऐवजी केवळ खाणमालकांच्या हितांचे रक्षण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Naveen Patnaik : सुधारित खाण कायद्यावरून बीजेडी अध्यक्ष नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांनी शुक्रवारी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. ओडिशातील सत्ताधारी भाजप लोकांच्या हक्कांऐवजी केवळ खाणमालकांच्या हितांचे रक्षण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. गांधी जयंतीनिमित्त बीजेडीच्या महिनाभर चालणाऱ्या जन संपर्क पदयात्रेचा शुभारंभ करताना पटनायक बोलत होते.
सुधारित कायद्यामुळे खनिजसंपन्न जमिनीवरील राज्याचे घटनात्मक अधिकार आणि खाणमालकांवर उपकर आकारण्याचे अधिकार कमी होत असल्याचा दावा त्यांनी केला. हा कायदा ओडिशात लागू झाल्यास राज्याचे सुमारे एक लाख कोटी रुपयांचे नुकसान होईल, असेही त्यांनी (Naveen Patnaik) म्हटले.
केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात ओडिशातील भाजपचे २० खासदार संसदेत गप्प राहिल्याचा आरोप पटनायक यांनी केला. तसेच राज्य सरकार महसूल, कल्याणकारी योजना आणि कायदा – सुव्यवस्था या आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, भाजपचे प्रवक्ते अनिल बिस्वाल यांनी पटनायक यांचे आरोप फेटाळले. बीजेडी आमदारांनी विधानसभेत खाण क्षेत्रावरील चर्चा होऊ दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला. खाण कंपन्यांकडून बीजेडीला मोठ्या प्रमाणात राजकीय देणग्या मिळाल्याचा दावाही बिस्वाल यांनी केला. बीजेडीच्या पदयात्रेदरम्यान पक्षाचे नेते राज्यातील प्रत्येक गावात आणि घरात पोहोचून सरकारच्या कथित अपयशांबाबत जनजागृती करणार असल्याचे पटनायक (Naveen Patnaik) यांनी सांगितले.






