नाटोची दुटप्पी भूमिका: भारताच्या तेल खरेदीवर आक्षेप, युरोपच्या गॅस खरेदीकडे दुर्लक्ष

नवी दिल्ली – रशियाकडून तेल खरेदी करणार्या चीन, ब्राझीलसह भारतावर 100% सेकंडरी शुल्क लावण्याचा इरादा नाटो संघटनेने जाहीर केला आहे. याला अमेरिकेचाही पाठिंबा आहे. मात्र नाटोची ही भूमिका दुटप्पी म्हणजे डबल स्टँडर्ड असणारी आहे असे मत भारताने व्यक्त केले आहे. भारताच्या रशियाकडून तेल खरेदीला नाटो हरकत घेत आहे, मात्र नाटोचे सदस्य असलेले युरोपियन देश रशियाकडून भारतापेक्षा जास्त प्रमाणात गॅस खरेदी करीत असल्याच्या बाबीकडे भारतीय प्रवक्त्याने लक्ष वेधले.
नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रिएटी ऑर्गनायझेशनचे प्रमुख मार्क रूट यांनी गेल्या आठवड्यात भारताने जर रशियाचे तेल खरेदी केले तर भारतावर शंभर टक्के सेकंडरी शुल्क लावण्याचा ईरादा जाहीर केला होता. यावर परराष्ट्र व्यवहार खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यानी सांगितले की, अशा प्रकारच्या डबल स्टँडर्ड संदर्भात नाटोने काळजी घेण्याची गरज आहे.
भारतासारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या देशाला ऊर्जा सुरक्षिततेकडे अधिक लक्ष द्यावे लागते. याची दखल नाटोने घेण्याची गरज आहे. रशियाकडून तेल खरेदी करणार्याबाबत एकास वेगळा न्याय तर दुसर्यास वेगळा न्याय देणे योग्य वाटत नाही. मुक्त बाजारपेठेच्या तंत्रज्ञानानुसार भारत जेथून स्वस्त तेल मिळेल तेथून खरेदी करीत आहे. मात्र नाटो यासंदर्भात दुटप्पी भूमिका घेत आहे.
युरोपकडून होते जास्त खरेदी
प्राप्त माहितीनुसार 2022 पासून युरोपने रशियाचा सर्वात जास्त गॅस खरेदी केला आहे. तर नाटोचा सदस्य असलेल्या तुर्कियेनेे रशियाचे खनिज तेल जास्त प्रमाणात खरेदी केले आहे. तसेच युरोप एका दिवसात रशियाकडून जेवढा गॅस खरेदी करतो तेवढे तेल भारत तीन महिन्यात खरेदी करतो असे पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंग पुरी यांनी काल सांगितले होते.





