National Sports Day : महिला क्रिकेट-संघर्षातून यशाकडे
भारतीय महिला क्रिकेटचा प्रवास खरे तर अत्यंत संघर्षातून सुरू झाला. सुरुवातीला खेळाडूंकडे सुविधा तर नव्हत्याच, परंतु मानधनही इतके कमी होते की त्यांना स्थिर-स्थावरही होता येत नव्हते.

National Sports Day : भारतीय महिला क्रिकेटचा प्रवास खरे तर अत्यंत संघर्षातून सुरू झाला. सुरुवातीला खेळाडूंकडे सुविधा तर नव्हत्याच, परंतु मानधनही इतके कमी होते की त्यांना स्थिर-स्थावरही होता येत नव्हते. मात्र, आज तशी परिस्थिती नाही. बीसीसीआयने आपल्या छत्रछायेखाली महिला क्रिकेटला घेतल्यापासून या खेळाडूंनाही सुगीचे दिवस आले आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाने गेल्या काही दशकांमध्ये क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवला. नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे जेतेपदही मिळवले.
आता नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत आपण साखळी फेरीतच गारद झालो. हे कोणा एका खेळाडूच्या अपयशामुळे नव्हे, तर संपूर्ण संघ आपण जगज्जेते आहोत, या थाटात खेळला. ऑस्ट्रेलियाच्या संघाकडे पाहिले तर लक्षात येते, की त्यांनी संघाचा समतोल किती चांगला बसवला आहे. त्यांच्या संघातही अनुभवी व नवोदित आहेतच, परंतु त्यांनी त्यांचा जो ताळमेळ राखला आहे त्याला तोड नाही. हे आपल्याला का जमत नाही याचा कुठेतरी व कधीतरी विचार होणार आहे का? हाच खरा प्रश्न आहे.
भारतीय महिला संघ टी-20, एकदिवसीय व कसोटी या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो. 2005 आणि 2017 मध्ये वनडे वर्ल्डकप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. परंतु, पदरी निराशा पडली. 2020 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकले आणि 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. आता यंदा नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकातही भारताच्या महिला क्रिकेट संघाला उपांत्य फेरी गाठण्यात यश आले नसले तरी मात्र, भारताच्या महिला क्रिकेटचा प्रवास संघर्षातून समृद्धीकडे सुरू आहे, यात शंका नाही.
येत्या काळात भारतीय महिला क्रिकेट संघ विविध स्पर्धांमध्ये व मालिकांमध्ये सहभागी होणार आहे. त्यात हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे लक्ष राहणार आहे. संघात अनुभवी व नवोदित खेळाडूंचा भरणा आहे. त्यात प्रिया पुनियासारख्या अफलातून गुणवत्ता असलेल्या खेळाडूही आहेत. प्रतीका रावल जरी दुखापतीने जायबंदी झालेली असली तरीही ती लवकरच संघात परतेल, असे संकेत आहेत त्यामुळेही संघाला दिलासा मिळाला आहे. शांता रंगास्वामी, मिताली राज आणि झूलन गोस्वामी यांसारख्या महान खेळाडूंनी भारतीय महिला क्रिकेटला जागतिक स्तरावर नेऊन ठेवले. तीच परंपरा हरमनच्या संघाला कायम ठेवायची आहे व त्यासाठी सातत्याने होत असलेल्या सामन्यांमध्ये कमालीची जबाबदारी स्वीकारून कामगिरी करावी लागणार आहे.
इंग्लंडविरुद्ध भारतीय महिला संघाने लॉर्ड्सवर कसोटी खेळली. त्यातील कामगिरी पाहिली तर भारताची जी भक्कम मानली जात होती तीच फलंदाजी कोसळली. एक स्मृती मानधना किंवा हरमनप्रीत कौर आणखी किती काळ संघाची नौका किनार्याला लावणार, हा प्रश्न आहेच. बीसीसीआयने जशी पुरुष क्रिकेट संघाची 30 खेळाडूंची फळी उभी केली आहे तेच चित्र महिला संघाबाबतही केले गेले पाहिजे. यातूनच सेकंड बेंच मिळणार आहे. शेफाली वर्मा चांगली फलंदाज आहे. तिला लेडी सेहवागही म्हणतात; मात्र ती आरंभशूर ठरत आहे. सुरुवात चांगली करते, मात्र त्याचा शेवट गोड करत नाही. धावांच्या तिशीत किंवा पस्तिशीतच ती बाद होत आहे. मोठी खेळी करण्यासाठी लागणारा संयम तिने ठेवला तर संघाला सुरुवातही भक्कम मिळेल. त्यासाठी हाय परफॉर्मन्स प्रशिक्षकाची सध्या नितांत गरज आहे.
भारताच्या पुरुष क्रिकेट संघाकडे ज्या दर्जाचा सपोर्ट स्टाफ आहे तसाच स्टाफ महिला संघासाठीही असला पाहिजे. त्याचबरोबर भारताच्या महिला संघाला सातत्याने परदेशात मालिका खेळण्यासाठीही पाठवले गेले पाहिजे. त्यामुळे विविध देशांतील वातावरण, खेळपट्टी व तिथे काही सराव सामने खेळून आपली तयारी करणे शक्य होणार आहे. भारतीय महिला संघ कात टाकत आहे हे आपण गेली बरीच वर्षे एकत आहोत; मात्र प्रत्यक्षात जे सातत्य दिसायला हवे होते ते अद्याप दिसत नाही याचे आश्चर्य वाटते. हरमनप्रीत कौर चांगली कर्णधार आहे; मात्र कपिलदेव म्हणतात तसे भारताला चांगल्या नव्हे तर महान कर्णधाराची गरज आहे.
हरमनला महान बनायचे असेल तर सर्वात आधी तिला तिच्या नेतृत्वाबरोबरच वैयक्तिक कामगिरीतही सातत्य दाखवावे लागणार आहे. शर्यतीत स्मृती मानधना आहेच, परंतु तिच्यावर नेतृत्वाचा भार टाकला तर फलंदाजीची कमान कोण सांभाळणार हा खरा प्रश्न आहे. अन्य देशांच्या संघातील खेळाडू आपापली जबाबदारी समर्थपणे पेलताना दिसतात मग आपले घोडे कुठे अडते हेच समजत नाही. संघात नवोदित खेळाडू आहेत व त्यांना अनुभव कमी आहे, हे सगळे मान्य केले तरी जेव्हा संधी मिळते तेव्हा तरी त्याचे सोने करणे आपल्याच हाती आहे ना? त्यांना चांगली कामगिरी करण्यापासून कोणी अडवले आहे.
विजयाचे शिल्पकार
भारतीय महिला क्रिकेट संघासाठी सर्वात अभिमानास्पद क्षण म्हणजे त्यांनी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली आयसीसी एकदिवसीय विश्वचषक जिंकून रचलेला ऐतिहासिक विजय. अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर आणि दोनदा अंतिम फेरीत पराभूत झाल्यानंतर (2005 आणि 2017), त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अंतिम सामना जिंकून हे विश्वविजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक प्रवासात अनेक युवा आणि अनुभवी खेळाडूंचे योगदान राहिले आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरसह स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज आणि दीप्ती शर्मा यांनी महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला विजयाच्या शिखरावर नेले आहे. विश्वचषकातील या ऐतिहासिक विजयामुळे महिला क्रिकेटला मोठा पाठिंबा मिळाला आहे. बीसीसीआयने खेळाडूंसाठी 51 कोटींचे विक्रमी बक्षीस जाहीर केले, तसेच महिला आयपीएल यांसारख्या स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील मुलींनाही मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळत आहे.
परदेशातील पहिला मालिकाविजय
पुरुष क्रिकेटप्रमाणे आता महिला क्रिकेटलाही दिवसेंदिवस मोठी पसंती मिळत असल्याचे दिसत आहे. आयसीसी क्रमवारीत भारतीय महिला संघ सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. गेल्या काही काळात भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करत जगावर छाप सोडली आहे. जुलै 2025 मध्ये, भारताने इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी अजिंक्य आघाडी घेत, पाहिलीवहिली महिला टी-20 मालिका जिंकली. वॉर्सेस्टर येथे झालेल्या चौथ्या टी-20 सामन्यात हा ऐतिहासिक विजय झाला, जिथे भारतीय फिरकीपटू राधा यादव, दीप्ती शर्मा आणि नवोदित श्री चरणी यांनी इंग्लंडला 126/7 धावांवर रोखले. सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी 18 चेंडू शिल्लक असताना सहा गडी राखून लक्ष्याचा आरामात पाठलाग केला.
हा विजय एक ऐतिहासिक यश ठरला, कारण भारताने यापूर्वी कधीही इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर किंवा परदेशात टी-20 मालिका जिंकली नव्हती. शिस्तबद्ध गोलंदाजी आणि अफलातून क्षेत्ररक्षणाने भरलेली ही कामगिरी इंग्लंडमध्ये 2026 च्या महिला टी-20 विश्वचषकापूर्वीची महत्त्वाची तयारी म्हणूनही काम करत होती.
नोव्हेंबर 2025 मध्ये, नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करून भारताने त्यांचा पहिला महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला. उपांत्य फेरीत, त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 339 धावांचे मोठे लक्ष्य गाठले, जो महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग आहे. हा विजय मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला आणि भारतातील महिला क्रिकेटसाठी एक महत्त्वाचा क्षण म्हणून ओळखला गेला.
बदललेली परिस्थिती
भारतीय महिला संघाने क्रिकेटजगतात मोठा टप्पा पार केला. सुरुवातीला महिला खेळाडूंना मोठा संघर्ष करावा लागला. महिला क्रिकेट संघाविषयी अनास्था, उदासीनता होती. त्यांना मोठा निधीही देण्यात येत नव्हता. महिला क्रिकेट संघाच्या सुरुवातीच्या दिवसातील संघर्षगाथा आता समोर आली आहे. या महिला खेळाडूंना देशातच नाही तर परदेशातही जमिनीवर, फरशीवर झोपावे लागत होते. कमी पैशात तजवीज करावी लागत होती. प्लास्टिकच्या कपातून डाळभात खावा लागत होता. 20 खेळाडूंसाठी केवळ 4 टॉयलेटची सोय असायची. स्वतंत्र रूम असणे हे तर दिवास्वप्नच होते.
परदेशात सामना खेळण्यासाठी जाणे हे महिला क्रिकेट संघासाठी दिव्यच असायचे. कारण तिकीट खरेदीपासून मारामार सुरू व्हायची. त्यासाठी प्रायोजक शोधावे लागायचे. एनआरआय खेळाडूंचे पालक त्यासाठी योगदान द्यायचे. प्रसिद्ध अभिनेत्री व समालोचक मंदिरा बेदी यांनी महिला खेळाडूंसाठी विमानांची तिकिटे काढल्याचे आणि अनेकदा एअर इंडियाने या तिकिटांचा खर्च उचलल्याची आठवण विक्रमादित्य सुनील गावसकर यांच्या भगिनी नूतन गावसकर यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितली होती.
अशा परिस्थितीतून वाटचाल करत आज महिला क्रिकेट संघाने बराच दूरचा प्रवास केला आहे. मोठा टप्पा पार केला आहे. हे अंतर कापणे नक्कीच सोपे नव्हते. या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी महिला खेळाडूंना मोठा संघर्ष करावा लागला. भारतात क्रिकेटची क्रेझ असली, तरी महिला क्रिकेटकडे प्रेक्षकांपासून प्रशासनापर्यंत सर्वांचीच उदासीनता होती. त्या काळाच्या संघर्षातून तर आता आयसीसी महिला विश्वचषकाचा मजबूत दावेदार, मजबूत संघापर्यंतची महिला क्रिकेट संघाचीही कामगिरी नक्कीच अभिमानस्पद आहे. आता भारताच्या महिला क्रिकेटचे भविष्य हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाच्या हाती सुरक्षित आहे. स्मृती मानधनाकडून प्रेरणा घेत प्रिया पुनिया, श्रेयांका पाटीलसारख्या नवोदित खेळाडू पुढे येत आहेत व त्यांच्याच जोरावर पुरुष क्रिकेटप्रमाणेच महिला क्रिकेटमध्येही भारताचा दबदबा निर्माण होईल, असा विश्वास वाटतो.
एशियन गेम्समधील आव्हान
आशियाई क्रीडा स्पर्धा (एशियन गेम्स) यंदा जपानमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेत क्रिकेटचाही समावेश करण्यात आला आहे. भारताकडून पुरुष आणि महिला क्रिकेट संघ सहभागी होणार असल्याने चाहत्यांमध्ये आतापासूनच उत्सुकता आहे. आता क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. भारतीय महिला संघ आधी मैदानात उतरणार असून, पुरुष संघाला मात्र थेट क्वार्टर फायनलमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.
मात्र, गेल्या काही महिन्यांत मर्यादित षटकांच्या सामन्यांत संघाची कामगिरी सातत्यपूर्ण राहिलेली नसल्याने या स्पर्धेत खेळाडूंचा कस लागणार आहे. भारतीय महिला संघाच्या स्पर्धेला 18 सप्टेंबरपासून सुरुवात होईल. पहिल्याच सामन्यात भारताचा सामना यजमान जपानशी होणार आहे. महिला क्रिकेटमध्ये भारतासोबत श्रीलंका, मलेशिया, बांगलादेश, पाकिस्तान, चीन, थायलंड आणि जपान हे संघ असतील. भारताला अंतिम फेरी गाठायची असेल तर जपानविरुद्धच्या सामन्यानंतर उपांत्य फेरीतही चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
भारतीय पुरुष संघाला ग्रुप स्टेज खेळण्याची गरज नाही. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या चार संघांना थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. ग्रुप अ मध्ये अफगाणिस्तान, जपान आणि नेपाळ असतील, तर ग्रुप ब मध्ये हाँगकाँग, मलेशिया आणि ओमान हे संघ खेळतील. भारताचा क्वार्टर फायनल सामना 28 सप्टेंबरला ग्रुप अ मधील दुसर्या क्रमांकाच्या संघाविरुद्ध होईल. भारताचा पुरुष संघ थेट क्वार्टर फायनलमध्ये उतरणार असल्याने त्याचा पहिला सामना 28 सप्टेंबरला होईल. त्यानंतर संघाला उपांत्य आणि अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी सामने जिंकावे लागतील. महिला संघाची सुरुवात 18 सप्टेंबरला होणार आहे, तर पुरुष संघाची मोहीम 28 सप्टेंबरपासून सुरू होईल. त्यामुळे आशियाई गेम्समध्ये भारताच्या दोन्ही संघांकडून पदकाची अपेक्षा असणार आहे.
आशिया कपचेही दडपण
एशियन गेम्सपूर्वी भारतीय महिला संघ आशिया कप स्पर्धेत उतरणार आहे. एकाअर्थी एशियन गेम्ससाठी ही स्पर्धा एक चांगला सराव ठरणार आहे. मात्र, त्यात भारताचा पहिला सामना थायलंडशी तर नंतरचा सामना हाँगकाँग या दुबळ्या संघांशी जरी होत असला तरीही 5 सप्टेंबरला परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होणार आहे. त्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे लक्ष राहणार आहे. भारताने थायलंड व हाँगकाँगला पराभूत केले तर ते थेट उपांत्य फेरीत स्थान मिळवतील. या स्थितीत पाकिस्तानकडून जरी भारताचा पराभव झाला तरी त्यावर काहीही परिणाम होणार नाही.
परंतु या स्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघाचे पारडे पाकिस्तानविरुद्ध कायमच जड राहिले असल्याने भारतीय संघ हे तीनही सामने जिंकत थाटात उपांत्य फेरी गाठेल असा विश्वास आहे. 13 सप्टेंबरला या स्पर्धेचा अंतिम सामना होत असून त्यानंकतर पाचच दिवसांत जपानमध्ये एशियन गेम्स सुरु होत आहेत. यंदा भारताला या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याची नामी संधी आहे. पाहु या काय होते ते…






