National Sports Day: चिमुकल्या फियोना भन्साळीची ‘बॅले’त गरूडझेप…!
National Sports Day: शिस्त, लवचिकता आणि चिकाटीच्या जोरावर महानगरांतील २०० हून अधिक स्पर्धकांना मागे टाकत पुण्याच्या चिमुकलीची सुवर्णभरारी.

National Sports Day: मनात जिद्द, कलेची आवड आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने मेहनत करण्याची तयारी असेल, तर वय कधीच यशाच्या आड येत नाही. पुण्याच्या नऊ वर्षांच्या फियोना भन्साळीने आपल्या बॅलेच्या प्रवासातून हेच सिद्ध केले आहे. चेन्नई येथे झालेल्या ‘कॉमनवेल्थ सोसायटी ऑफ टीचर्स ऑफ डान्स इंडिया’च्या (सीएसटीडी) प्रतिष्ठित राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत वयोगट 7 ते 9 मधील सोलो बॅले प्रकारात सुवर्णपदक पटकावत फियोनाने राष्ट्रीय चॅम्पियन होण्याचा मान मिळवला.
विशेष म्हणजे या विजयामुळे पुढील वर्षी ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे होणार्याल सीएसटीडी वर्ल्ड डान्स चॅम्पियनशिपसाठी तिची थेट निवड झाली असून, जागतिक मंचावर ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. चेन्नईतील त्या काही मिनिटांच्या सादरीकरणा-मागे मात्र फियोनाच्या चार वर्षांच्या अथक मेहनतीची कहाणी आहे. देशभरातील नामांकित डान्स अकादमींमधून आलेल्या 200 हून अधिक स्पर्धकांसमोर फियोना आत्मविश्वासाने उभी राहिली.
दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता यांसारख्या महानगरांतील स्पर्धकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचे आव्हान तिच्यासमोर होते. तिच्या हातात होती शास्त्रीय बॅलेमधील प्रसिद्ध ‘स्वान लेक’ची अवघड रचना आणि सादरीकरणासाठी मिळाले होते अवघे दोन मिनिटे 30 सेकंद. संगीत सुरू झाले आणि फियोनाच्या हालचालींमध्ये बॅलेची नजाकत उतरली. शरीराची लवचिकता, तोल, पावलांमधील अचूकता आणि चेहर्याेवरचे भाव यांचा सुरेख मेळ तिच्या सादरीकरणात पाहायला मिळाला.
लहान वय असूनही तिच्या सादरीकरणात दिसणारा आत्मविश्वास आणि नियंत्रण परीक्षकांच्या नजरेत भरले. सादरीकरण संपल्यानंतर मिळालेली उत्स्फूर्त दाद आणि अखेर जाहीर झालेले सुवर्णपदक, फियोनासाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला. मात्र फियोनाचा बॅलेशी संबंध या स्पर्धेपुरता मर्यादित नाही. वयाच्या पाचव्या वर्षी तिने नृत्याचे पहिले धडे गिरवायला सुरुवात केली. पुणे कॅम्प परिसरातील बॅले प्रशिक्षण संस्थेत तिच्या प्रवासाला सुरुवात झाली. गुरू नेहा सुहजानी यांच्या मार्गदर्शनाखाली तिने बॅलेचे बारकावे आत्मसात केले. सुरुवातीची आवड हळूहळू ध्येयात बदलली आणि त्या ध्येयासाठी सराव हा तिच्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग बनला.
‘ब्लॅक स्वान’ मुळे स्वप्नांचा पाठलाग…
फियोनासाठी मात्र या विजयाचा आनंद एका नव्या स्वप्नाची सुरुवात आहे. ‘ब्लॅक स्वान’ हा चित्रपट पाहिल्यानंतर तिच्या मनात प्रोफेशनल बॅले डान्सर होण्याचे स्वप्न रूजले. आता ते स्वप्न आंतरराष्ट्रीय मंचापर्यंत पोहोचले आहे. मला बॅले खूप आवडते. ‘ब्लॅक स्वान’ पाहिल्यापासून मला प्रोफेशनल बॅले डान्सर व्हायचे आहे. आता ऑस्ट्रेलियात जाऊन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भाग घ्यायचा आहे, असे फियोना सांगते. चेन्नईतील सुवर्णपदकामुळे तिच्यासमोर पर्थच्या जागतिक स्पर्धेचे दार उघडले आहे. त्यामुळे राष्ट्रीय विजेतेपदानंतर आता तिच्या सरावाला आंतरराष्ट्रीय स्तराचे लक्ष्य मिळाले आहे. पुढील काही महिने तिच्यासाठी अधिक मेहनतीचे, अधिक शिकण्याचे आणि स्वतःला अधिक सक्षम करण्याचे असतील.
तीन तासांचा सराव…
राष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीसाठी फियोना दररोज तब्बल तीन तास सराव करत होती. एका बाजूला शाळेचा अभ्यास, दुसर्याो बाजूला नृत्याचा कठोर सराव आणि त्यासोबत बालपणातील इतर गोष्टी या सगळ्यांचा समतोल साधणे सोपे नव्हते. पण फियोनाने शिस्तीने प्रत्येक गोष्टीसाठी वेळ दिला. तिच्यासाठी बॅले म्हणजे केवळ नृत्य नव्हते; शरीर आणि मनावर नियंत्रण ठेवण्याचा तो एक प्रवास होता.
बॅलेमध्ये एखादी हालचाल सुंदर दिसण्यासाठी तिच्यामागे अनेक तासांचा सराव असतो. शरीराची लवचिकता, स्नायूंची ताकद, संतुलन, एकाग्रता, शिस्त आणि सातत्य या सर्वांचा कस लागतो. फियोनाने लहान वयातच या गोष्टींचे महत्त्व समजून घेतले. एखादी हालचाल अचूक झाली नाही, तर ती पुन्हा पुन्हा करण्याची तयारी, सादरीकरणात भाव कमी पडला, तर त्यावर काम करण्याची चिकाटी, यातूनच तिची कामगिरी घडत गेली.
कुटुंबाची अन् गुरूंची भक्कम साथ…
या प्रवासात फियोनाला कुटुंबाची भक्कम साथ लाभली. आई एकता भन्साळी आणि वडील अल्पेश भन्साळी यांनी तिच्या आवडीला सुरुवातीपासून प्रोत्साहन दिले. फियोना चे आजोबा ज्येष्ठ व्यावसायिक अनिल भन्साळी यांची पुण्यात सामाजिक कार्याशी विशेष नाळ जोडली आहे मंदिर उभारणी असो की गरजूंना शैक्षणिक आरोग्य संबंधित मदतीत ते नेहमीच पुढे असतात फियोना ने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे त्याअनुषंगाने पुण्याचे नाव उज्ज्वल करावे अशी त्यांची इच्छा आहे त्यासाठी ते नेहमीच नातीच्या पाठीशी उभे राहून तिला प्रोत्साहित करतात.
यांच्यासह कुटुंबातील प्रत्येकाने तिच्या स्वप्नाला आपलेसे केले. फियोनाच्या सरावासाठी वेळ देणे, स्पर्धांसाठी तयारी करून घेणे आणि प्रत्येक छोट्या-मोठ्या यशानंतर तिचा आत्मविश्वास वाढवणे, हे कुटुंब सातत्याने करत आले. आई एकता भन्साळी यांच्या मते, फियोनाला लहानपणापासूनच नृत्याची विशेष आवड होती. तिच्या आवडीला दिशा देताना अभ्यासाकडेही दुर्लक्ष होऊ नये, याची काळजी घेण्यात आली.
शिस्त आणि सातत्य हीच फियोनाच्या यशाची गुरुकिल्ली असल्याचे त्या सांगतात. गुरू नेहा सुहजानी यांनाही फियोनाच्या मेहनतीचा अभिमान आहे. बॅलेसाठी आवश्यक असलेली शारीरिक क्षमता आणि समर्पण तिच्यात लहान वयापासूनच दिसून येते. नऊ वर्षांच्या वयोगटात राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवणे ही तिच्या मेहनतीची पावती असल्याचे त्या सांगतात. फियोनाच्या कामगिरीमुळे पुण्यातील बॅले नृत्यालाही नवी ओळख मिळत असल्याचे त्यांचे मत आहे.
तरच अशी मोठी झेप घेता येते…
फियोनाची गोष्ट केवळ एका चिमुकल्या नृत्यांगनेच्या विजयाची नाही. पाचव्या वर्षी सुरू झालेला प्रवास नवव्या वर्षी राष्ट्रीय चॅम्पियनशिपपर्यंत पोहोचला आहे. एका छोट्या मुलीच्या स्वप्नाला कुटुंबाची साथ, गुरूंचे मार्गदर्शन आणि स्वतःची जिद्द मिळाली, की त्यातून अशीच मोठी झेप घेता येते, याचे फियोना हे सुंदर उदाहरण आहे. आज तिच्या हातात राष्ट्रीय सुवर्णपदक आहे, उद्या तिच्या नजरा पर्थच्या जागतिक मंचावर असतील. बॅलेच्या तालावर पडणार्या तिच्या प्रत्येक पावलात आता केवळ एका मुलीचे स्वप्न नाही, तर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची उमेदही आहे. पुण्याच्या या चिमुकल्या कलाकाराची आंतरराष्ट्रीय भरारी आता कुठे सुरू झाली आहे.
– हर्षद कटारिया






