National Sports Day: ज्यूदोच्या मॅटवर भारताची सुवर्णभरारी…!
National Sports Day: १९६५ मधील ज्यूदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या स्थापनेपासून ते सेऊल आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकांपर्यंत; भारतीय ज्यूदोची संघटनात्मक वाटचाल.

National Sports Day: भारतामध्ये ज्यूदो खेळाची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढत आहे. एकेकाळी मोजक्या खेळाडूंपुरता मर्यादित असलेला हा खेळ आता ग्रामीण भागापासून महानगरांपर्यंत पोहोचला असून, भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली ताकद दाखवू लागले आहेत. 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील अस्मिता डे आणि हर्ष सिंह यांच्या ऐतिहासिक सुवर्णपदकांनी या प्रवासाला नवे वळण दिले आहे.
अस्मिता डे हिने महिलांच्या 48 किलो वजनी गटात, तर हर्ष सिंहने पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात ज्युदोमध्ये भारताला मिळालेले हे पहिले सुवर्णपदक ठरले. अस्मिता ही राष्ट्रकुलमध्ये ज्यूदोचे सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला, तर हर्ष पहिला भारतीय पुरुष ज्युदोपटू ठरला. याच स्पर्धेत उन्नती शर्मा हिने महिलांच्या 63 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकतालिकेत भर घातली.
भारतात ज्यूदोच्या संघटनात्मक वाटचालीची सुरुवात 1965 मध्ये ज्यूदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या स्थापनेपासून झाली. 1966 मध्ये हैदराबाद येथे पहिली राष्ट्रीय ज्यूदो अजिंक्यपद स्पर्धा झाली. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवण्यास सुरुवात केली. 1986च्या सेऊल आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने प्रथमच ज्यूदोमध्ये सहभाग घेतला आणि पदार्पणातच चार कांस्यपदके मिळवली.
ऑलिम्पिकमध्येही भारतीय ज्यूदोपटूंनी सहभाग नोंदवला आहे. नरेंद्र सिंह हे 1992 आणि 1996च्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे पहिले भारतीय ज्यूदोका ठरले. 2010च्या ताश्कंद ज्यूदो विश्वचषकात मणिपूरच्या थौदाम कल्पना देवी हिने पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू म्हणून इतिहास घडवला. सुशीला लिकमाबाम, अक्रम शाह, अंगोम अनिता चानू, अवतार सिंग, कावास बिलिमोरिया, गरिमा चौधरी आणि टॉम्बी देवी यांसारख्या खेळाडूंनी भारतीय ज्यूदोची ओळख मजबूत केली आहे.
त्यांच्या कामगिरीमुळे या खेळाला देशात नवी ओळख मिळाली असून, आता अस्मिता आणि हर्षसारखी नवी पिढी ही परंपरा पुढे नेत आहे. भारतीय ज्यूदोचे भविष्य घडवण्यात युवा खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीचा मोठा वाटा आहे. हिमांशी टोकसने महिलांच्या 63 किलो वजनी गटातील ज्युनियर जागतिक क्रमवारीत अव्वलस्थान मिळवून नवा इतिहास रचला. 610 गुणांसह ती पहिल्या क्रमांकावर पोहोचली. शाहिन राजकभाई दरजाडाने 57 किलो गटात चौथे स्थान मिळवले आहे.
कंवरप्रीत कौर, इशरूप नारंग आणि नुंगशिथोई चानू लेशांगथेम यांनीही आपापल्या गटात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ‘खेलो इंडिया’ आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या माध्यमातून आधुनिक प्रशिक्षण, सुविधा आणि स्पर्धात्मक अनुभव मिळत असल्याने ग्रामीण व लहान शहरांतील तरुणांनाही ज्यूदोकडे आकर्षित होण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे भारतातील ज्यूदोचा पाया अधिक मजबूत होत आहे.
राष्ट्रकुलमधील अस्मिता आणि हर्षचे सुवर्णयश हा केवळ दोन खेळाडूंचा विजय नाही, तर भारतीय ज्यूदोच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. 2030च्या राष्ट्रकुलपासून पुढील आशियाई आणि ऑलिम्पिक स्पर्धांपर्यंत भारतीय ज्यूदोपटू सातत्याने पदके जिंकतील, अशी अपेक्षा आहे. आज ज्यूदो भारताची नवी क्रीडा ओळख बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि उद्या हीच वाटचाल देशाच्या क्रीडा अस्मितेचा अभिमान ठरू शकते.
– सुनिल राऊत






