National Sports Day: मुठीत जिद्द अन् नजरेत विजेतेपद! पुण्याच्या बॉक्सिंगचा ‘पंच’
National Sports Day: आमदार रमेशदादा बागवे आणि प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर बॉक्सिंग असोसिएशनचे २४ वर्षांचे यशस्वी योगदान.

National Sports Day: रिंगमध्ये उतरणारा बॉक्सर केवळ प्रतिस्पर्ध्याशी लढत नसतो, तो स्वतःच्या मर्यादांशीही दोन हात करत असतो. प्रत्येक ‘पंच’मागे असते मेहनत, प्रत्येक हालचालीमागे असते तांत्रिक तयारी आणि प्रत्येक विजयामागे असतो प्रशिक्षक, पालक व संपूर्ण क्रीडा व्यवस्थेचा हात. पुणे शहराने गेल्या अनेक वर्षांत अशाच जिद्दी बॉक्सरना घडवत महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बॉक्सिंग नकाशावर आपले नाव ठळकपणे उमटवले आहे. पुणे शहर बॉक्सिंग संघटनेच्या 24 वर्षांच्या वाटचालीत राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेले हजारो खेळाडू ही या परंपरेची मोठी साक्ष आहे.
महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात पुण्याचे स्थान आधीपासूनच महत्त्वाचे आहे. त्यात बॉक्सिंगने पुण्याच्या क्रीडा संस्कृतीला आणखी एक वेगळी ओळख दिली. पुणे शहर बॉक्सिंग संघटना महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटना आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेशी संलग्न असून शहरातील बॉक्सिंग क्लब, प्रशिक्षण केंद्रे आणि खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार,
माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांच्या नेतृत्वाखाली साधारण 1990 पासून संघटनेची वाटचाल सुरू आहे. दादांच्या मार्गदर्शनातून विविध स्पर्धा, प्रशिक्षण शिबिरे आणि खेळाडूंसाठीच्या उपक्रमांना सातत्याने चालना मिळत आहे. या वाटचालीतील सर्वांत उल्लेखनीय बाब म्हणजे खेळ आर्थिक अडचणीमुळे थांबू नये, यासाठी केले जाणारे प्रयत्न. उन्हाळी आणि हिवाळी मोफत प्रशिक्षण शिबिरे, गरजू व गुणवंत खेळाडूंसाठी दत्तक योजना आणि आवश्यक क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्याचे उपक्रम यामुळे अनेक होतकरू खेळाडूंना संधी मिळत आहे.
पुण्याच्या बॉक्सिंगचा ‘पंच’; ‘महिला’ बॉक्सरना नवे बळ
महिला बॉक्सिंगच्या विकासासाठी सुरू करण्यात आलेली ‘डहश उरप डहश थळश्रश्र’ ही मोहीम या प्रयत्नांचा महत्त्वाचा भाग ठरली आहे. रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल आणि पुणे शहर बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बॉक्सर दत्तक योजना राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून महिला खेळाडूंना केवळ रिंगमधील प्रशिक्षण नव्हे, तर खेळाडू म्हणून आवश्यक असलेल्या विविध बाबींचे मार्गदर्शन दिले जाते.
भारतीय महिला बॉक्सिंग संघाचे प्रशिक्षक आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते डी. चंद्रलाल तसेच शिवकुमार पाल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रशिक्षण देण्यात येते. आहार व डायट प्लॅन, दुखापत प्रतिबंध व उपचार, क्रीडा मानसशास्त्र आणि आधुनिक ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर अशा विविध घटकांचा प्रशिक्षणात समावेश करण्यात आला आहे. या योजनेसाठी झालेल्या प्रशिक्षण शिबिरात 84 महिला खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यापैकी 16 गुणवंत खेळाडूंची दत्तक योजनेसाठी निवड करण्यात आली. निवड झालेल्या खेळाडूंना सुमारे दोन लाख रुपयांपर्यंतचे दर्जेदार बॉक्सिंग साहित्य वितरित करण्यात आले.
देविका अन् चंदा…!!
सातत्यपूर्ण प्रशिक्षण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि स्पर्धेचा अनुभव देऊन भविष्यातील चॅम्पियन घडविण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न आहे. पुण्याच्या महिला बॉक्सरनीही या संधीचे सोने केले आहे. 2022 मध्ये स्पेन येथे झालेल्या युथ विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेत देविका घोरपडेने सुवर्णपदक मिळविले. सर्बियातील युथ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चंदा उडनशिवेने सुवर्णपदक पटकावले. अल्मास शेखने राष्ट्रीय स्पर्धेत तीन वेळा सुवर्णपदक मिळविले. सई डावखरेने अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत कांस्यपदक तसेच खेलो इंडिया स्पर्धेत दोन कांस्यपदके मिळविली. तेजश्री भामेने शालेय राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक मिळविले, तर झीनत शेख आणि सृष्टी चोरगे यांनी राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.
’पंच’मागे तंत्रज्ञान आणि रणनीती
बॉक्सिंग म्हणजे केवळ ताकदीचा खेळ नाही. प्रतिस्पर्ध्याच्या हालचाली वाचणे, अंतराचा अचूक अंदाज घेणे, योग्य वेळी पंच करणे आणि परिस्थितीनुसार रणनीती बदलणे हे या खेळाचे गमक आहे. लेफ्ट स्ट्रेट, राईट स्ट्रेट, लेफ्ट हुक, राईट हुक, लेफ्ट अपरकट आणि राईट अपरकट हे मूलभूत पंच असून, त्यासोबत क्रॉस पंच आणि विविध पंच कॉम्बिनेशनचा वापर खेळाडू आपल्या रणनीतीनुसार करतात.
याच तांत्रिक बारकाव्यांवर भर देत पुण्यातील प्रशिक्षक नव्या पिढीला तयार करीत आहेत. विजय गुजर, राम जगताप, उमेश जगदाळे, सुनील काळे, मृणाल भोसले, विशाल गव्हाणे आणि ऋषिकेश निकाळजे यांसारख्या अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे नवोदित खेळाडूंना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळत आहे. आत्मविश्वास, शिस्त आणि स्पर्धात्मक दृष्टिकोन विकसित करण्यावरही भर दिला जात आहे.
हजारो पदकांची परंपरा
पुणे शहर बॉक्सिंग संघटनेच्या कामगिरीचा आवाका मोठा आहे. गेल्या 24 वर्षांत 7,334 खेळाडूंनी राज्यस्तरावर, 2,510 खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर पदके मिळविली असून, 58 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. संघटनेच्या गिरीश पवार, राकेश कळसकर, सलमान शेख आणि रेनॉल्ड जोसेफ या चार खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला आहे. या पैकी तीन खेळाडूंनी जनरल अरुण कुमार वैद्य स्टेडियम सराव केला.
इंडियन आर्मी, पोलीस, रेल्वे आणि सीआरपीएफसारख्या सेवांमध्येही अनेक खेळाडूंनी विशेष प्राविण्य मिळविले आहे. या यशामागे खेळाडूंइतकीच तांत्रिक अधिकार्यांतची आणि पंचांची भूमिकाही महत्त्वाची आहे. भरतकुमार व्हावळ, मदन वाणी, सुरेशकुमार गायकवाड, अशोक मेमजादे, अभिमन्यू सूर्यवंशी, जीवन निंदाने, प्रदीप वाघे, कुणाल पालकर, उमेश जगदाळे, विनोद कुंजीर, आसिफ शेख आणि सनी परदेशी यांसारख्या अनुभवी तांत्रिक अधिकार्यांीचे पॅनेल संघटनेकडे आहे.
अत्याधुनिक प्रशिक्षणाची साथ
भवानी पेठेतील जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियममध्ये क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आधुनिक बॉक्सिंग प्रशिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आमदार तथा माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या आद्य क्रांतिगुरू लहुजी बॉक्सिंग स्टेडियममध्ये गेल्या 15 वर्षांपासून खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षणाची सुविधा मिळत आहे. पुण्यातील विविध बॉक्सिंग क्लबना क्रीडा साहित्य, प्रशिक्षण सुविधा आणि रिंग उपलब्ध करून देण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. परिणामी, बॉक्सिंगचा प्रसार केवळ काही मोजक्या केंद्रांपुरता मर्यादित न राहता शहराच्या विविध भागांत पोहोचत आहे.
घुमणारा ‘पंच’ अन् स्वप्नांची चाहूल…
आज पुण्याच्या बॉक्सिंग रिंगमध्ये घुमणारा प्रत्येक पंच एका मोठ्या स्वप्नाची चाहूल देतो. काही खेळाडू राज्यस्तर गाठतील, काही राष्ट्रीय पातळीवर चमकतील, तर काहींच्या मुठीतून भारताला आंतरराष्ट्रीय आणि ऑलिम्पिक पदक मिळू शकते. प्रशिक्षकांची मेहनत, तांत्रिक अधिकार्यांरचे योगदान, संघटनेचे प्रयत्न आणि खेळाडूंची जिद्द यांची सांगड अशीच कायम राहिली, तर पुण्याच्या रिंगमधून देशासाठी ऑलिम्पिक दर्जाचे बॉक्सर घडण्याची परंपरा निश्चितच आणखी भक्कम होईल. कारण पुण्याच्या बॉक्सिंगची खरी ताकद केवळ आज मिळालेल्या पदकांत नाही; ती आहे उद्याचा चॅम्पियन घडविण्यासाठी आज रिंगमध्ये घाम गाळणार्याद प्रत्येक खेळाडूच्या जिद्दीत आहे.
– अविनाश बागवे, अध्यक्ष, पुणे शहर बॉक्सिंग संघटना.






