National Sports Day : सामना जिंकल्याआधी स्वत:ला जिंका….; पदकासोबतच आरोग्यही महत्त्वाचे
खेळाडू म्हणजे मेहनत, शिस्त, जिद्द आणि विजयासाठी सुरू असणारी धडपड. मैदानावर प्रतिस्पर्ध्याला मागे टाकण्यासाठी कौशल्य आणि सराव आवश्यक असतो.

National Sports Day : खेळाडू म्हणजे मेहनत, शिस्त, जिद्द आणि विजयासाठी सुरू असणारी धडपड. मैदानावर प्रतिस्पर्ध्याला मागे टाकण्यासाठी कौशल्य आणि सराव आवश्यक असतो. मात्र फक्त सराव करून उत्कृष्ट कामगिरी करता येत नाही. त्यासाठी शरीर सक्षम आणि मनही खंबीर असणे आवश्यक आहे.
खेळाडूच्या शरीराला सामान्य व्यक्तीपेक्षा अधिक ऊर्जा आणि पोषक घटकांची गरज असते. त्यामुळे आहारात प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्वे आणि खनिजे असणे आवश्यक आहे. त्यामुळे खेळाचा प्रकार, सरावाची तीव्रता, वय आणि शरीराची गरज लक्षात घेऊन आहाराचे नियोजन करणे अधिक योग्य ठरते.
खेळताना घामामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि अशक्तपणा जाणवू शकतो. त्यामुळे दिवसभर पुरेसे पाणी पिण्याची सवय लावून घ्यावी. जास्त घाम येणार्या परिस्थितीत शरीराला द्रव आणि इलेक्ट्रोलाइट्सची गरजही वाढू शकते.
झोप म्हणजे नैसर्गिक रिकव्हरी
प्रशिक्षणाइतकीच झोपही महत्त्वाची आहे. पुरेशा झोपेमुळे स्नायूंना विश्रांती मिळते, मानसिक थकवा कमी होतो. सामान्यतः प्रौढ व्यक्तीसाठी सात ते नऊ तासांची झोप उपयुक्त मानली जाते. मात्र खेळाडूची झोपेची गरज त्याच्या दिनचर्येनुसार बदलू शकते. त्यामुळे नियमित झोपेची वेळ ठेवणे आवश्यक आहे.
वॉर्म-अप आणि स्ट्रेचिंग
खेळाडूने मैदानात उतरण्यापूर्वी शरीराला सरावासाठी तयार करण्यात वॉर्म-अप महत्त्वाची भूमिका बजावते. वॉर्म-अपने शरीराचे तापमान वाढण्यास आणि स्नायूंना हालचालींसाठी तयार होण्यास मदत होते.
दुखापतीकडे दुर्लक्ष नको
खेळात दुखापत होणे स्वाभाविक आहे. मात्र दुखापतीनंतर जबरदस्तीने सराव सुरू ठेवणे धोकादायक असते. स्नायूंमध्ये सतत वेदना, सूज, असामान्य थकवा किंवा हालचाली करताना त्रास जाणवत असल्यास वेळीच डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट किंवा संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे
विजयाची अपेक्षा, निवड होण्याची चिंता, पराभवाची भीती, प्रशिक्षक, प्रेक्षकांच्या अपेक्षा आणि दबाव यांचा परिणाम मनावर होऊ शकतो. पराभव हा खेळाचा अविभाज्य भाग आहे. पराभवातून धडा घेऊन नव्या तयारीने उभे राहणे गरजेचे आहे. ध्यान, श्वसनाचे व्यायाम, पुरेशी विश्रांती आणि सकारात्मक विचाराने मानसिक ताण कमी होऊ शकतो.
– रो. डॉ. योगेश गाडेकर, एम.बी.बी.एस., एम.एस. स्त्रीरोगतज्ज्ञ,
शिवनेरी हॉस्पिटल अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी






