National Sports Day: ढोल-ताशाच्या तालातून संस्कृती, संघटन, सुदृढतेचा संदेश
National Sports Day: रक्तदान शिबिर, आपत्तीग्रस्तांना मदत आणि अंध विद्यार्थ्यांच्या वाद्यपथकाची उभारणी; सांस्कृतिक परंपरेसोबत सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण.

National Sports Day: महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेत ढोल-ताशा वादनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. केवळ उत्सवाची रंगत वाढवणारा खेळ म्हणून नव्हे, तर तरुणाईला एकत्र आणणारे, शिस्त आणि संघभावना निर्माण करणारे प्रभावी माध्यम म्हणूनही ढोल-ताशा पथकांकडे पाहिले जाते. याच उद्देशाने एकदंत वाद्यपथकाची स्थापना 2012 मध्ये संस्थापक व पथकप्रमुख उमेश उत्तमराव भेलके यांच्या पुढाकारातून करण्यात आली.
पुण्याची आणि महाराष्ट्राची संस्कृती जपणे, तरुणांचे संघटन करणे आणि त्यांना सकारात्मक दिशेने प्रवृत्त करणे हा या पथकाच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देश आहे. आजच्या डिजिटल युगात अनेक तरुणांचा मोठा वेळ मोबाईलमध्ये जातो. अशा परिस्थितीत ढोल-ताशाच्या सरावाच्या माध्यमातून तरुणांना प्रत्यक्ष मैदानावर आणून त्यांच्यात शिस्त, एकाग्रता, सहकार्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम एकदंत वाद्यपथक करत आहे.
ढोल-ताशा वादन हा केवळ सांस्कृतिक उपक्रम नाही, तर शारीरिकदृष्ट्याही उपयुक्त असा खेळ आहे. नियमित सरावामुळे शरीराची हालचाल वाढते, व्यायाम होतो आणि शारीरिक तंदुरुस्ती राखण्यास मदत होते. त्याचबरोबर ताल, लय आणि समूहातील समन्वय साधताना एकाग्रता वाढते. संघासोबत काम करण्याची सवय लागल्याने नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकीची भावनाही विकसित होते. त्यामुळे तरुणांना वाईट विचार आणि नकारात्मक प्रवृत्तींपासून दूर ठेवण्यासाठी हे माध्यम प्रभावी ठरते.
एकदंत वाद्यपथकाची सामाजिक बांधिलकीही उल्लेखनीय आहे. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली म्हणून दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. तसेच आपत्तीग्रस्तांना मदत करण्याबरोबरच अंध विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि वाद्यपथक उभारणीसाठी मदत केली जाते. त्यामुळे सांस्कृतिक उपक्रमासोबत सामाजिक जाणीव जपण्याचे कार्यही पथकाच्या माध्यमातून सातत्याने केले जाते.
ढोल-ताशा ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग असलेली परंपरा आहे. या कलेच्या माध्यमातून पुण्याच्या संस्कृतीचे तसेच संपूर्ण महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन घडते. त्यामुळे ढोल-ताशा वादनाला केवळ मनोरंजन किंवा उत्सवापुरते मर्यादित न ठेवता राज्य दर्जाचा खेळ म्हणून मान्यता मिळणे गरजेचे आहे. अशा मान्यतेमुळे या कलेला अधिक व्यापक व्यासपीठ मिळेल आणि नव्या पिढीला तिच्याशी जोडण्याची प्रेरणा मिळेल.
एकदंत वाद्यपथकाचा प्रवास म्हणजे संस्कृती, सामाजिक बांधिलकी, शारीरिक तंदुरुस्ती आणि तरुणांच्या सकारात्मक संघटनाचा सुंदर संगम आहे. ढोल-ताशाच्या प्रत्येक तालातून महाराष्ट्राची अस्मिता जपण्याचा आणि तरुणाईला सक्षम करण्याचा संदेश देणारे हे पथक निश्चितच प्रेरणादायी आहे.
– शब्दांकन: सागर येवले





