National Sports Day: स्वच्छ भारत, समर्थ भारत
National Sports Day: लहानपणीच्या कुस्ती व मैदानी खेळांच्या आठवणींना उजाळा देत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मांडले क्रीडा क्षेत्राचे महत्त्व.

National Sports Day: श्रावण महिना सुरू आहे आणि सहजपणे आजूबाजूला डोकावले तर अनेक घरांत महिला पारंपरिक खेळ खेळताना दिसतील. उंच झोके घेणे आणि पूर्ण शरीराचे चापल्य कायम राहील असे अनेक पारंपरिक खेळ महिला अत्यंत सहजपणे आणि उत्साहात सादर करताना दिसतात. भारतीय क्रीडाप्रकारांचे हेच वैशिष्ट्य आहे की त्याच्यात शक्ती, बुद्धी आणि चापल्य या तिन्हीचा अनोखा संगम आहे.
खेळ म्हटले की माझ्याही मनात नकळत चैतन्य निर्माण होते. मुळशीच्या डोंगररांगातील हिरव्यागार वनराईने नटलेले निसर्गरम्य माझे गाव आठवते. जेथे आम्ही विहिरींमध्ये उड्या टाकून सहजपणे पोहायला शिकलो. मामासाहेब मोहोळ यांच्यासारख्या कुस्तीमधील संघटकांनी प्रत्येक मुलाच्या मनात कुस्ती रूजवलेली होती. त्यामुळेच तालमींमध्ये जोर-बैठका काढणे आणि कुस्तीचे डाव सहजतेने शिकू लागलो होतो.
रानांमध्ये फिरताना गलोर तयार करायची आणि नेम धरून फळे पाडायची, त्याच्यातून एकाग्रता, दृष्टीची स्थिरता या गोष्टी सहजपणे रूजल्यात. गावातील तरण्याबांड युवकांच्यात अभूतपूर्व ऊर्जा असायची; परंतु संध्याकाळी दोन तास मातीत खेळताना त्या ऊर्जेला सकारात्मकता लाभायची. पट काढताना पूर्ण ताकद लावली जायची; परंतु कुस्ती संपल्यावर जिंकण्या व हरण्यापेक्षा त्यात घेतलेला आनंद मनात अधिक काळ रेंगाळायचा.
त्या खेळांनी खूप आनंद दिला आणि सवंगडीही दिले. मी थोडा स्मरणरंजनात गुंतलो खरा; परंतु खेळाविषयी काहीही लिहिताना मला माझा भूतकाळ आठवतो. आज देशाचा केंद्रीय राज्यमंत्री असताना देशातील क्रीडाक्षेत्राकडे पाहण्याची भूमिका आमूलाग्र बदललेली आहे हेही लक्षात येते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्याच वर्षी क्रीडा धोरण अस्तित्वात आले.
हे क्रीडा धोरण परिपूर्ण आणि देशाच्या विकासातील खेळाचे योगदान अधोरेखित करणारे आहे. प्रत्येक मुलाच्यात खेळ असतोच पण त्याच्यातील प्रतिभा ओळखणे आणि त्याला विविध क्रीडा स्पर्धेत खेळण्याची संधी देणे हा या क्रीडा धोरणाचा प्रमुख भाग आहे. खेळ आपल्या विकासातील विशेषतः आर्थिक वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे क्षेत्र आहे. त्याचा नेमका विचार करून क्रीडा पर्यटन, क्रीडा साहित्याच्या निर्मितीतून क्रीडाउद्योगाला चालना याच्यावरही विशेष लक्ष पुरवले जाते आहे.
आज देशात होणार्या हजारो मॅरॅथॉन स्पर्धांच्या माध्यमातून क्रीडाउद्योग किती बहरतो आहे, हे सहजपणे समजू शकेल. खेळांच्या माध्यमातून सामाजिक अभिसरणही मोठ्या प्रमाणावर घडवता येते, क्रीडा धोरणात त्याचाही बारकाईने विचार केला गेला आहे. क्रीडास्पर्धा व्यक्तिगत पातळीवर मानसिक स्थैर्य निर्माण करतातच, पण त्याचबरोबर समाजातील ऐक्य भावना अधिक वृद्धिंगत करण्याच्यातही मोठे योगदान देतात.
‘खेलो इंडिया’सारख्या चळवळीतून देशातील कोट्यवधी जनतेला क्रीडाप्रकारांशी जोडून घेण्याचा उद्देशही सफल होताना दिसतो आहे. नव्या शैक्षणिक धोरणात शिक्षणाबरोबरच खेळालाही तेवढेच महत्त्व देण्यात आले आहे. क्रीडा संस्कृती विकसित करण्यासाठी गावापासून राष्ट्रीय पातळीपर्यंत क्रीडास्पर्धांचे सातत्याने आयोजन करणे, या क्रीडास्पर्धा यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी विविध खेळांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे, क्रीडासंघटना मजबूत करणे, क्रीडाक्षेत्रासाठी आर्थिक तरतूद भक्कमपणे करणे, खेळाडूंच्या समग्र विकासासाठी उच्चकोटीची प्रशिक्षण व्यवस्था उभी करणे, अशा अनेक पातळ्यांवर आज पावले उचलली गेली आहेत आणि जाताहेत.
प्रत्येक मतदारसंघात खासदार क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा एक निर्णय घेतला गेला. गेल्या वर्षी मी पुण्यात आयोजित केलेल्या या स्पर्धात 37 विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आला आणि त्याच्यातील सहभागींची संख्या पन्नास हजार होती. देशातील प्रत्येक मतदारसंघात घेतल्या गेलेल्या या खासदार क्रीडा स्पर्धांमुळे लक्षावधी खेळाडूंना आपले कौशल्य सादर कऱण्याची संधी मिळालीच पण त्याचबरोबर कोट्यवधी क्रीडा रसिकांना आनंद घेता आला. महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केली तेव्हा त्याच्यात प्रथमच महिलांसाठी प्रेक्षक गॅलरी करण्यात आली.
महापौर असतानाही ‘महापौर चषक’ क्रीडा स्पर्धेत हजारो खेळाडू सहभागी होतील याकडे लक्ष दिलेच; परंतु त्याचबरोबर पुण्यातील प्रत्येक भागात क्रीडा स्पर्धा होतील, याचीही दक्षता घेतली. निरोगी शरीर आणि निरोगी मन असेल तर व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास निर्माण होतो. एक सकारात्मक भावना मनात घर करते. त्यातून जीवनाकडे पाहण्याची दृष्टी अधिक रचनात्मक राहते.
असे सुदृढ मन मग केवळ स्वतःपुरता विचार करीत नाही तर समाजाचा आणि पर्यायाने राष्ट्राचाही विचार करते. त्याचे मन स्पर्धात्मक असते; परंतु त्याच्यात वैरभावनेला स्थान नसते. त्याच्या मनात जिंकण्याची ईर्ष्या असते; परंतु विजयासाठी वाममार्गाचा अवलंब करण्यास मन तयार होत नाही. जगणे म्हणजे संघर्ष आलाच आणि त्या संघर्षाला भिडण्याची मानसिकता खेळामुळेच निर्माण होते.
त्याच्यातून येणारी झुंजण्याची मानसिकता आयुष्याचा प्रवास पुढचे पाऊल टाकत निरंतर सुरू राहतो. व्यक्तिमत्त्वात यासारखे सकारात्मक बदल झाले तर अशा कोट्यवधी मनांच्यातून विकसित भारत 2047 चे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे. क्रीडा क्षेत्रात व्यक्तिमत्त्व विकसित होते अशा कोट्यवधी विकसित व्यक्तिमत्त्वातून राष्ट्रनिर्माणाची प्रक्रिया अधिक वेग घेते.
– मुरलीधर मोहोळ, खासदार, पुणे,
केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री







