रूपगंध : अंगठी

– डॉ. विनोद गोरवाडकर
सखाराम घाईघाईने धाब्यावरून खाली आला आणि स्वयंपाकघरात काम करीत असलेल्या बायकोजवळ जाऊन म्हणाला, ‘अगं सुलभा, जरा डोळे मिट आणि हात पुढे कर बघू.’ नवर्याच्या या अचानक वेगळ्या रूपाने सुलभा चकित झाली. तिच्या चेहर्यावर प्रश्नचिन्ह उमटले; पण तिने काही न बोलता डोळे मिटले व हात पुढे केला. काही क्षणात तिच्या हाताला कसला तरी स्पर्श झाला. सखारामने सांगायच्या आतच तिने डोळे उघडले आणि ती हाताकडे बघू लागली तर तिच्या हातावर एक अंगठी सखारामने ठेवलेली होती.
तिने ती अंगठी डोळ्यांजवळ आणली. बारकाईने पाहिली आणि ती एकदम आश्चर्यआनंदाने ओरडलीच, ‘अहो ही तर माझी हरवलेली अंगठी.’ त्याच्या चेहर्यावर हास्य होते आणि सानंद समाधानाही. या अंगठीची मोठी गंमतच झाली होती. कशी, तो सारा इतिहास सखारामच्या डोळ्यासमोर तरळू लागला. साधारण चार वर्षांपूर्वीची ती घटना असावी. आतासारखेच पावसाळ्याचे दिवस होते. तीन खोल्यांच्या घरामध्ये सखाराम आणि सुलभाचा संसार आनंदाने सुरू होता. दोन मुलगे आणि एक मुलगी असणार्या या जोडीला प्रापंचिक अडचणी नेहमी असायच्या; पण आहे त्यात सुख मारणारे हे नवरा बायको आपल्या संसारासाठी सतत कष्ट करायचे.
त्यादिवशी पावसाने अंधारून आले. लवकर स्वयंपाक करूया या हेतूने सुलभाने संध्याकाळचा बेत ठरवला. सखाराम अजून कामावरून यायचा होता. मुलं अभ्यासाला बसली होती, तेवढ्यात लाइट गेले. अंधारलेल्या घरात दोन तीन कंदील लावून थोडासा उजेड सुलभाने केला. अभ्यास करणे शक्य नसल्याने गल्लीतल्या मुलांबरोबर खेळण्यासाठी म्हणून मुलं बाहेर गेली आणि सुलभा स्वयंपाकाला लागली.
शेवग्याच्या शेंगांची भाजी आणि भाकरी असा फक्कड बेत तिने करण्यास प्रारंभ केला. गॅसवर भाजीचे आधण ठेवले. शेंगा चिरून छान मसालेदार वाटण करून तिने खमंग फोडणी घातली आणि भाकरीचे पीठ मळावयास प्रारंभ केला. छान लुसलुशीत पीठ मळून झाल्यानंतर तिने हात धुण्यासाठी मोरीवर ठेवलेला प्लॅस्टिकचा मग हातात घेतला. दोन्ही हातांवर हळूहळू पाणी घातले. मग तिच्या लक्षात आले आपल्या उजव्या हाताच्या अनामिकेत असणार्या अंगठीमध्ये पीठ अडकले आहे. म्हणून तिने हातातून अंगठी काढली. ती स्वच्छ धुतली. मोरीच्या अर्ध्या भिंतीवर तिने ती ठेवली. पुन्हा एकदा हात स्वच्छ धुतले आणि ती भाकरी टाकण्यासाठी म्हणून स्वयंपाकघरात कामाला लागली.
अर्ध्या तासाच्या आत सुलभाचा स्वयंपाक सिद्ध झाला. घरभर शेवग्याच्या शेंगांच्या भाजीचा वास दरवळू लागला. लसणाची चटणी तिने सोबतीला केली. नागलीचे पापड भाजले. हे होत असतानाच सखाराम कामावरून घरी आला. त्याला पाहून बाहेर खेळणारी मुलं त्याच्यासोबतच घरात आली. सर्वांनी हात पाय धुतले. देवाजवळ दिवा लावून मुलांनी प्रार्थना म्हटली. सायंकाळचे नित्यक्रम करून मुलं आणि सुलभा व सखाराम सगळेच जेवण्यासाठी म्हणून बसले.
मोठ्या प्रेमाने तयार केलेला तो स्वयंपाक अतिशय रुचकर लागत होता. यथेच्छ भोजन करून मुलं ताटावरून उठली. तेवढ्यात लाइट आली. सखारामने टीव्ही लावला आणि तो व मुलं टीव्हीमध्ये गुंग झाली. सुलभाने पाठीमागची आवरासावर केली आणि ती देखील टीव्ही बघण्यासाठी म्हणून येऊन बसली. सहज दोन्ही हात एकमेकांवरती चोळले आणि तिला लक्षात आले की आपली अंगठी मोरीच्या भिंतीवरच राहिली आहे.
सुलभा उठली मोरीपाशी गेली आणि तिथे ठेवलेल्या हंड्याच्या शेजारी आपली अंगठी बघू लागली. पण तेथे अंगठी नव्हती. तिने आजूबाजूला पाहिले. आतमध्ये पाहिले. अगदी छोटासा असणारा तो भाग दहा दहा वेळेस पाहिला पण अंगठी मात्र तिला सापडत नव्हती. ती मनातून घाबरली. बाहेर येऊन सखारामला सांगू लागली, ‘अहो, माझी अंगठी सापडत नाहीये.’ ते ऐकून सखाराम आणि मुलं पुन्हा एकदा आतमध्ये आले आणि ते देखील अंगठी शोधू लागले. अंगठी कुठे ठेवली होती, का बरं ठेवली होती, असा सगळा प्रश्नाचार झाल्यानंतर पुन्हा पुन्हा अंगठीचा शोध घेऊनही अंगठी सापडत नव्हती. पीठ मळून झाल्यानंतर अंगठी काढून धुण्याची सुलभाची नेहमीची पद्धत असल्याने ती कुठे दुसरीकडे टाकेल अशी शक्यताही नव्हती. मात्र आता अंगठी काही केल्या सापडत नव्हती.
मोठ्या बेचैन अवस्थेत सुलभा आणि सखाराम अंथरुणावर पडले पण त्यांना झोप येत नव्हती. दुसर्या दिवशी अगदी सकाळी सकाळीच पुन्हा एकदा अंगठीचा शोध सुरू झाला. घर झाडून झाले. भांडी पाहून झाली. पाणी जिथून वाहत जात होते त्या ठिकाणी शोध घेतला गेला. गॅसच्या अवतीभवती अंगठी पडली की काय म्हणून तेथेही पाहिले पण कुठेही अंगठी नव्हती आणि सुलभाला अंगठी मोरीच्या भिंतीवरच ठेवल्याचे खात्रीने आठवत होते. दुसरा दिवसही अस्वस्थतेत गेला. तिसरा, चौथा, पाचवा असे अनेक दिवस अंगठी सापडल्याविनाच गेले. घरात परके माणूस न येता आणि सुलभा बाहेर न जाता अशाप्रकारे अंगठी गायब व्हावी हे मोठे आश्चर्यच होते.
हळुवारपणे अंगठीची आठवण बुजू लागली. कष्टाने घेतलेली ती सोन्याची अंगठी केव्हातरी स्मृतिपटलावर दिसू लागे आणि मन अस्वस्थ होई; पण आता या स्मृतीलाही बोथटपणा प्राप्त झालेला होता. या घटनेला होता करता चार वर्षे उलटली. दरम्यानच्या काळात पावसाळा आला की घराच्या कौलांची डागडुजी करावी लागत असे. यंदाही ही डागडुजी करण्याची वेळ आली. ठरलेल्या माणसाला सखारामने बोलावले. काय करायचे, कसे करायचे हे त्याला ठाऊक होते. तो कारागीर आणि सखाराम असे दोघे हळूहळू धाब्यावर चढले.
कौलांना इजा पोहोचणार नाही अशा पद्धतीने त्या सौम्य उतार असणार्या धाब्यावर चढून कडेने पाहणी करू लागले. फुटलेली कौले काढून तिथे नवी कौल टाकायची, हललेली कौले योग्य पद्धतीने रचायची, आजूबाजूला निघालेली माती योग्य पद्धतीने बसवायची हे सारे निश्चित झाले. काम दरवर्षीचे असल्याने पैशांचे काही ठरवायचे नव्हतेच. उद्या सकाळी काम सुरू करू असे ठरवून सखाराम आणि कारागीर खाली उतरायचे म्हणून वळले आणि सखारामला त्याच्या पायाजवळ असणार्या कौलाच्या फटीत काहीतरी चमकल्यासारखे दिसले. तो खाली वाकला. मातीच्या भुसभुशीत असणार्या अगदी छोट्याशा ढीगामध्ये त्याने पाहिले तर त्याला एकदम चार वर्षांपूर्वी हरवलेली सुलभाची अंगठी दिसली. सखारामला हा खूप मोठा आश्चर्यआनंदाचा धक्काच होता.
त्याने हळुवारपणे ती माती बाजूला केली तेव्हा अंगठी सुस्पष्टपणे दिसू लागली. त्याने ती अंगठी उचलली. कपाळाला लावली आणि खाली येऊन स्वयंपाकघरात काम करणार्या सुलभाच्या हातात ती ठेवली. अर्थातच सुलभाला तो मोठा धक्काच होता. देवाजवळ साखर ठेवून दोघांनी देवाला नमस्कार केला आणि अशाप्रकारे अंगठी कौलांमध्ये कशी जाऊ शकेल याचा विचार ते करू लागले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की सुलभा पीठ मळत असताना पिठाचा काही भाग अंगठीमध्ये राहून गेला असावा आणि त्या पिठाच्या वासामुळे एखाद्या उंदराने ती अंगठी पळवली असावी. त्यानंतर बिळातून ती अंगठी हळुवारपणे तो उंदीर वर घेऊन गेला असावा.
चार वर्षांच्या काळात ऊन, वारा, पाऊस याच्या मार्यातून अंगठी तशीच दोन कौलाच्या बेचकीत अडकून राहिली आणि योगायोगाने ती सखारामच्या नजरेस पडली. चांगल्या माणसाला चांगले फळ मिळते याचा हा साक्षात्कार होता. घामाच्या पैशाने घेतलेली ती अंगठी सखाराम आणि सुलभाच्या नशिबाला डावलून दूर जाऊच शकतच नव्हती.





