National Games 2023 : मल्लखांब, मॉडर्न पेंटॅथलॉनमधील निर्विवाद वर्चस्वामुळे महाराष्ट्र अग्रस्थानी!

पणजी :- गोवा येथे सुरू असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मल्लखांब, मॉडर्न पेंटॅथलॉनमधील निर्विवाद वर्चस्वामुळे शनिवारी महाराष्ट्र अग्रस्थानी कायम आहे. हरयाणा आणि गतविजेत्या सेनादल यांना महाराष्ट्राच्या क्रीडपटूनी तोलामोलाची टक्कर देत मात केली आहे. महाराष्ट्र संघाने मल्लखांब क्रीडा प्रकारात नऊ सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण 14 पदकांची लयलूट केली.
महाराष्ट्राच्या रुपाली गंगावणेने सोनेरी चौकाराची कामगिरी केली. यात वैयक्तिक तीन आणि सांघिक गटातील एका सुवर्णपदकाचा समावेश आहे. मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये महाराष्ट्राने निर्भेळ यश मिळवताना पाच सुवर्ण व दोन रौप्यपदकांची कमाई केली. संयुक्ता काळे आणि रिचा चोरडिया यांच्या दिमाखदार कामगिरीच्या बळावर जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राने एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण पाच पदके मिळवली.
कोमल वाकळेने वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारातील महिलांच्या ८७ किलो वजनी गटात सुवर्ण पदकावर नाव कोरले. तसेच तलवारबाजीत महाराष्ट्राच्या सॅब्रे संघाने रुपेरी यश संपादन केले. याचप्रमाणे पिंच्याक सिल्याट क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य अशी चार पदकांची कमाई केली.
#CWC23 #NEDvBAN : बांगला टायगर्स पुन्हा ढेर! नेदरलँड्सनं केला 87 धावांनी पराभव…
महाराष्ट्राने शनिवारी १७ सुवर्ण, ८ रौप्य, ७ कांस्य अशा एकूण ३३ पदकांची कमाई केली. महाराष्ट्राच्या खात्यावर आता ४२ सुवर्ण, २५ रौप्य, २६ कांस्य अशी एकूण ९४ पदके जमा आहेत.





