पणजी :- गोव्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आंतरराष्ट्रीय तलवारबाज अभय शिंदे आणि गिरीश जकातेने शुक्रवारी महाराष्ट्र संघाला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तलवारबाजीत पदके मिळवून दिली. या दोघांनी तलवारबाजी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी वैयक्तिक कांस्यपदके कमावली. तर छत्रपती संभाजीनगरच्या अभयने सेंबर प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. तसेच गिरीश जकाते हा इप्पी प्रकारात कांस्यपदक विजेता ठरला. महाराष्ट्राच्या रग्बी संघाला रौप्य पदक… राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुनील चव्हाणच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र रग्बी संघाने शुक्रवारी रौप्य पदकाचा बहुमान पटकावला. महाराष्ट्र पुरुष संघाला सलग दुसऱ्या वर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. हरयाणा संघाने 14-0 अशा फरकाने महाराष्ट्रावर मात केली. Asian Para Games 2023 : दोन्ही हात नसतानाही केली कमाल; भारताच्या शीतलचे तिरंदाजीत सुवर्णयश… सुनील चव्हाण, प्रशांत आणि बबलू यादव यांच्या सर्वोत्तम कामगिरीच्या बळावर महाराष्ट्र रग्बी संघाने ही कामगिरी केली. महाराष्ट्र संघाने उपांत्य फेरीत ओडीशा संघाला पराभवाची धूळ चारली. महाराष्ट्र संघाने 19-14 अशा फरकाने दणदणीत विजय संपादन केला. मुख्य प्रशिक्षक मीनल पास्ताला यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाने हे रुपेरी यश मिळवले.