राष्ट्रीय डेंग्यू दिवस विशेष : डेंग्यू रोखण्यासाठी जनजागृती, लोकसहभाग आवश्यक

पुणे – डेंग्यूचे नियंत्रण करायचे असेल, तर लोकसहभाग आवश्यकच आहे. त्याशिवाय नियंत्रण अशक्य नसल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. परंतु दुर्दैवाने तसे होत नाही, आणि दरवर्षी डेंग्यू बाधित सापडतातच. दि. 16 मे हा दिवस “राष्ट्रीय डेंग्यू दिवस’ म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने तरी जनजागृती आवश्यक आहे.
परिसरात वाढणाऱ्या डासांच्या अळ्यांचा प्रतिबंध, तेथील स्वच्छता, निरुपद्रवी साहित्याची विल्हेवाट आपणच लावायला हवी, पाणी साठू न देणे, पाण्याची भांडी वेळेवेळी स्वच्छ करणे, परिसर स्वच्छ ठेवणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
मात्र, हे सगळे सरकारनेच केले पाहिजे, अशी अपेक्षा ठेवली जाते. परंतु प्रत्यक्षात ही जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे.
डेंग्यू या विषाणूजन्य आजाराचा प्रसार “एडिस इजिप्ती’ डासाच्या मादीपासून होत असतो. जवळजवळ 50 टक्के लोकसंख्या या आजाराच्या प्रभावाखाली आहे. तसेच या आजारात 40 टक्के मृत्यूदर दिसून येतो. भारतात सन 2022 मध्ये एकूण दोन लाख 33 हजार 251 रुग्ण बाधित झाले तर 303 मृत्यू झाले. महाराष्ट्रात देशाच्या 3.67 टक्के रुग्ण, तर 8.91 टक्के मृत्यू झाल्याचे सरकारी अहवाल सांगतो.
ही आहेत डेंग्यूची लक्षणे
सौम्य स्वरुपाचा सततचा ताप, डोकेदुखी, डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचे पुरळ येतात. आजाराची तीव्रता वाढली तर मेंदूमध्ये ताप जातो. डोक्याचा पुढचा भागाचा दाह, चव आणि भूक नष्ट होणे, हिरड्यांमधून रक्तस्राव, अंतर्गत रक्तस्राव, आतड्यांमूधन रक्तस्राव, प्लेटलेटची संख्या कमी होणे, रक्तासह किंवा रक्ताविना वारंवार उलट्या होणे आदी लक्षणे दिसून येतात.
डेंग्यू नियंत्रणात येणारे अडथळे :
डासाची एक मादी 150 ते 200 अंडी घालतो. परिसरातील एक कंटेनर जरी तपासणीवाचून राहिला तरी गावातील साथ आटोक्यात येत नाही. अळ्या आढळलेले पाणी गटारात ओतले जाते. तेव्हाही या अळ्या जिवंत राहतात आणि त्यामुळेही साथ आटोक्यात येत नाही, त्यामुळे त्यांचा नायनाट करणे गरजेचे आहे.
आपल्या परिसराची आठवड्यातून एकदा स्वच्छता करा, पाणी साठणाऱ्या जागांचा बंदोबस्त करा. निरुपयोगी साहित्य, खराब झालेले टायर ट्यूब, प्लॅस्टिक यांची विल्हेवाट लावा. ताप आल्यास त्वरित तपासणी करून घ्या.
– डॉ. महेंद्र जगताप,राज्य कीटक प्रतिबंधक तज्ज्ञ, आरोग्य विभाग, पुणे





