आळेफाटा येथे विद्यार्थ्यांचा व्यसनमुक्तीचा जागर; पथनाट्याद्वारे जनजागृती

आळेफाटा – जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील बसस्थानक परिसरात प्रधान मंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्राच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. या उपक्रमाद्वारे गुटखा, तंबाखू, तंबाखूजन्य मसाला आणि मद्यपान यांच्या दुष्परिणामांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमात ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे पदाधिकारी तसेच बाळासाहेब जाधव महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उद्योजकता विकास केंद्राच्या ४० मुलींनी बसस्थानक परिसरात महिलांसह सर्व नागरिकांना व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगितले. या पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक वैशाली कु-हाडे, प्राध्यापक कदम, प्राचार्य प्रवीण जाधव आणि उपप्राचार्य संजय वाकचौरे यांनी विशेष सहकार्य केले. या जनजागृतीमुळे आळेफाटा परिसरात व्यसनमुक्त समाजाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे.





