Kapil Sibal : “मोदी सरकारसाठी राष्ट्र प्रथम नव्हे” – कपिल सिब्बल
मोदी सरकारकडे राष्ट्र प्रथम या दृष्टिकोनाचा अभाव आहे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांचे केवळ निवडणुका जिंकण्यावर लक्ष केंद्रित असते

Kapil Sibal – मोदी सरकारकडे राष्ट्र प्रथम या दृष्टिकोनाचा अभाव आहे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांचे केवळ निवडणुका जिंकण्यावर लक्ष केंद्रित असते, असे टीकास्त्र ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी सोडले. पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक स्तरावर गंभीर पेचप्रसंग उद्भवले आहेत.
गॅस, कच्च्या तेलाच्या आघाडीवर भारतातही त्या युद्धाची धग जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर, सध्याच्या संकटाचा मुकाबला टीम इंडिया भावनेतून करण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे कार्य करायला हवे, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी अधोरेखित करत आहेत.
मोदींच्या त्या भूमिकेचा संदर्भ घेऊन सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत केंद्रातील सरकार, सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. केवळ पेचावेळीच मोदींना टीम इंडियाची आठवण होते. इतर वेळी किंवा संसदेत त्यांच्या मनात तो विचार येत नाही, अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली.
अमेरिका-इस्त्रायल विरूद्ध इराण युद्धाच्या सर्वांधिक झळा भारताला बसू शकतात. मोठ्या देशांचा विचार केल्यास रशियाकडे कच्च्या तेलाचे प्रचंड साठे आहेत. चीन मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करतो. पण, त्यांना ते इतर स्त्रोतांकडूनही उपलब्ध होते. चीनची केवळ २० टक्के आयात होर्मूझच्या सामुद्रधुनीतून होते.
भारत गरजेच्या ८८ टक्के कच्च्या तेलाची आयात करतो. आपण कच्च्या तेलाच्या ५० लाख पिंपांची आयात करतो. त्यातील ३० लाख पिंप युद्धक्षेत्रात असणाऱ्या देशांतून येतात. आता कच्च्या तेलाचे दर प्रचंड वाढले आहेत.
त्यामुळे आयातीसाठी अधिक खर्च करावा लागेल. आपल्या अधिक किंमत चुकवून खतांची खरेदी करावी लागत आहे. गॅस, सल्फर, हेलियमही युद्धक्षेत्रातील देशांतून उपलब्ध होते, याकडे सिब्बल यांनी लक्ष वेधले.






