नसरापूर : नसरापूर गावातील बनेश्वर रस्त्याच्या विकासासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आता यश मिळाले आहे. आमदार शंकर मांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नसरापूर ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांमुळे दोन दिवसांपूर्वी पीएमआरडीएचे अधिकारी प्रत्यक्ष पाहणीसाठी आले. त्यांनी निरीक्षणादरम्यान माहिती दिली की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बनेश्वर मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल नऊ कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. या निधीतून पार्किंग व्यवस्था, अंतर्गत रस्ते, तसेच मंदिर परिसराचे सुशोभीकरण अशा विविध टप्प्यांतील कामे केली जाणार आहेत. ही माहिती मिळताच ग्रामपंचायतीच्या वतीने प्रतिनिधींनी देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले आणि बनेश्वर रस्त्याच्या भूमिपूजनासाठी निमंत्रणही दिले. त्यावर अजित पवारांनी पुण्यात आल्यानंतर वेळ देण्याचे आश्वासन दिले आहे. या साऱ्या विकास प्रक्रियेमध्ये ग्रामपंचायत सरपंच उषा विक्रम कदम यांचे विशेष योगदान राहिले आहे. कमी कालावधीत नसरापूरच्या विकासाचे भक्कम पायाभरणीचे कार्य सुरू करून विविध विकासकामांना चालना दिली आहे. त्यांचे एकमेव ध्येय म्हणजे ‘नसरापूरचा सर्वांगीण विकास’. ग्रामस्थांच्या समस्या वेळेत सोडवण्यासाठी त्या स्वतः पुढाकार घेत आहेत. आज सकाळी सात वाजता सरपंच उषा विक्रम कदम यांनी अजितदादा पवार यांची भेट घेऊन नसरापूरमधील कचरा व्यवस्थापन, नवीन पाणी प्रकल्प, रस्ते आणि इतर प्रलंबित कामांबाबत निवेदन दिले. यावर अजित पवारांनी लवकरात लवकर सर्व समस्या मार्गी लावण्याचे ठाम आश्वासन दिले. नसरापूरच्या ग्रामस्थांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे. “असा सरपंचच नसरापूरला हवा”, अशा शब्दांत नागरिकांनी आपले समाधान व्यक्त केले आहे. बनेश्वर रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याने भाविकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.