Nasrapur News : नसरापूरकरांनो सावधान! उघड्यावर कचरा टाकला तर खिसा रिकामा; थेट ‘इतक्या’ हजारांचा दंड
Nasrapur News : जागतिक पर्यावरण दिनी नसरापूर ग्रामसभेत कचरा समस्या, प्लास्टिकबंदी आणि अतिक्रमण हटविण्याबाबत महत्त्वपूर्ण ठराव मंजूर.

Nasrapur News – जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर ५ जून रोजी नसरापूर ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या ग्रामसभेत गावातील वाढती कचरा समस्या, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, प्लास्टिकमुक्त गाव, अतिक्रमण हटविणे आणि ग्रामपंचायत मालमत्तेचे संरक्षण यांसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नसरापूरच्या नागरिकांनी पहिल्यांदा कचरा टाकल्यास १ हजार, तर दुसऱ्यांदा व त्यानंतर प्रत्येक वेळी ३ हजार दंड आकारण्यात येणार आहे. गावाबाहेरील व्यक्तींनी नसरापूर हद्दीत कचरा टाकल्यास त्यांच्यावर ५ हजार दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी “माहिती द्या, बक्षीस मिळवा” योजना सुरू करण्यात आली असून उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांचा फोटो किंवा व्हिडिओ ग्रामपंचायतीला देणाऱ्या व्यक्तीस ५०० रु बक्षीस दिले जाणार आहे.
माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. ग्रामसभेत ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी व्यापारी असोसिएशनची विशेष बैठक घेण्यात येणार असून नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. वेल्हा-नसरापूर मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रशासन लवकरच मोहीम राबविणार आहे.
तसेच गावातील कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी कचरा गाडीसाठी निश्चित थांबे तयार करणे आणि विविध सार्वजनिक ठिकाणी मोठ्या कचराकुंड्या बसविण्याचा निर्णयही घेण्यात आला. ग्रामपंचायत मालकीच्या गाळ्यांचा गैरवापर होऊ नये यासाठी गाळ्यांमध्ये अनधिकृत पोटभाडेकरू नसल्याची खात्री केली जाणार आहे.
तपासणीत नियमभंग आढळल्यास संबंधितांना नोटीस बजावून गाळे रिकामे करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे ग्रामसभेत स्पष्ट करण्यात आले. याशिवाय सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांवरील झाकणांची तातडीने दुरुस्ती करणे, ग्रामस्थांच्या अर्जांवर चर्चा करून आवश्यक निर्णय घेणे तसेच गावाच्या विकासासाठी विविध उपाययोजना राबविण्याचा निर्धार ग्रामसभेत करण्यात आला.
“ग्रामपंचायत मालकीच्या गाळ्यांचा वापर नियमानुसारच झाला पाहिजे. कोणत्याही गाळ्यात अनधिकृत पोटभाडेकरू आढळल्यास संबंधितांना नोटीस बजावून गाळे रिकामे करण्याची कारवाई केली जाईल. ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचा योग्य वापर आणि नियमांचे पालन याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”
– उषा कदम, प्रशासक सरपंच, नसरापूर.






