पुणे जिल्हा | आयुक्तांच्या चौकशीला नसरापूर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याची दांडी

कापूरहोळ, (वार्ताहर) – सन २०१७ ते २०२० या कालावधीत दिव्यांग निधी वाटपातील लाभार्थ्यांला डावलल्याप्रकरणी केलेल्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी दि. ६ रोजी बोलावलेल्या बैठकीला नसरापूर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी दांडी मारली. तक्रारदार सोमनाथ उकिरडे यांचीच दोन तास चौकशी केली.
विभागीय आयुक्त यांच्याकडे दिव्यांगाच्या ५ टक्के अनुशेषाच्या संदर्भात १ मे २०२४ रोजी अर्ज केला होता. त्या अनुषंगाने पुणे विभाग अस्थापना उपायुक्त राहुल साकोरे यांनी जिल्हा परिषद पुणे यांना ९ मे २०२४ रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९ प्रमाणे कारवाईच्या अनुषंगाने अहवाल मागितला होता.
त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी २४ जून २०२४ रोजी वेल्हे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पंकज शेळके यांना चौकशीकामी नेमले असून त्यांनी ३० जुलै २०२४ रोजी भोरचे गटविकास अधिकारी यांना पत्र देऊन सूचित केले. तसेच नसरापूर ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी दि. ६ रोजी चौकशी कामी उपस्थित राहण्याचे कळविले होते.
मात्र, आज रोजी सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये तक्रार आणि ग्रामविकास अधिकारी व चौकशी अधिकारी शेळके फक्त उपस्थित होते. परंतु त्यावेळी ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य उपस्थित राहिले नाहीत. चौकशीकामी पंकज शेळके यांनी तक्रारदार यांचीच दोन तास चौकशी करून लिखित जाब-जबाब तीन पानी घेतला.
त्यांनी दप्तर तपासणीच्या अनुषंगाने ग्रामसेवक विजयकुमार अशोक कुलकर्णी यांना दप्तर मागितली असता त्यांनी दोन दिवसाची मुदत घेऊन माझा माणूस तुमच्या ऑफिसला कागदपत्रे पोहोच करतो, असे तोंडी सांगितले.
त्यामुळे तपासणी व चौकशीची नसरापूर ग्रामपंचायतचे कार्यकारी मंडळ सदस्य व ग्रामसेवक यांनी गांभीर्यांने दखल घेतलेली दिसून येत नाही. यावर चौकशी अधिकारी संबंधितांवर काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे आणि तक्रारदार यांचे लक्ष लागले आहे. कलम ३९ अंतर्गत ग्रामपंचायत नसरापूर कार्यकारी मंडळावर कारवाई होणार की नाही, याचे उत्तर येणारा काळच ठरवेल.
दिव्यांग निधी वाटपात झालेल्या अनियमिततेबाबत विभागीय आयुक्तांना तक्रार देऊन सर्व कागदोपतरी पुरावे सादर केली आहेत.
त्यानुसार आज पंकज शेळके यांनी चौकशी केली असून ग्रामपंचायत नसरापूरचे कार्यकारी मंडळ जाणीवपूर्वक गैरहजर होते. त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होणे अपेक्षित आहे. – सोमनाथ उकिरडे, (तक्रारदार,) नसरापूर
दिव्यांग निधी वाटप तक्रारीबाबत वरिष्ठ कार्यालयाचे आदेशानुसार आज नसरापूर ग्रामपंचायत कार्यालयात चौकशीचे कामकाज केले. त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवणार आहे. – पंकज शेळके (चौकशी अधिकारी) गटविकास अधिकारी, वेल्हे





