नसरापूर : ग्रामपंचायत नसरापूरतर्फे कर भरणाऱ्या मिळकतदारांसाठी आयोजित केलेला लकी ड्रॉ सोडत कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. बुधवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी चार वाजता ग्रामपंचायत कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. ग्रामपंचायतीने कर वेळेवर भरणाऱ्या नागरिकांसाठी प्रोत्साहनपर उपक्रम म्हणून आकर्षक बक्षिसांची सोय केली होती. यात पहिले पारितोषिक एलसीडी टीव्ही, दुसरे पारितोषिक फ्रिज, तिसरे पारितोषिक मिक्सर, चौथे पारितोषिक कुलर आणि पाचवे पारितोषिक इस्त्री असे ठेवण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये पारदर्शकता राखण्यासाठी मराठी शाळेतील काही विद्यार्थ्यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या हस्ते लकी ड्रॉ बॉक्स उघडण्यात आला व त्यातून पाच भाग्यवान करदात्यांची नावे निवडण्यात आली. या उपक्रमामुळे करदात्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामपंचायतीने घेतलेली ही अभिनव कल्पना सर्वांच्या कौतुकास पात्र ठरली आहे. ग्रामपंचायतीने पुढील काळातही अशा जनसहभागात्मक उपक्रमांद्वारे नागरिकांना वेळेवर कर भरण्यास प्रवृत्त करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.