Nasrapur Case: नसरापूर घटनेतील आरोपीला फाशी की जन्मठेप? आज शिक्षा सुनावली जाणार
Nasrapur Case: आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरविले होते.

Nasrapur Case: महाराष्ट्रदिनी १ मे रोजी नसरापूर येथे मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. या घटनेनंतर राज्यभरातून संतापाची लाट पसरली होती. या प्रकरणी आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला विशेष न्यायालयाने गुरुवारी (दि. २५) दोषी ठरविले.
त्यानंतर आज (दि. २९) कांबळे याला मृत्युदंड की जन्मठेपेची शिक्षा होणार, याचा निकाल लागणार आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयात हा निकाल होणार आहे. राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आलेल्या या घटनेचा अवघ्या दोन महिन्यात निकाल लागणार आहे. (Nasrapur Case)
विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचे नमूद करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे, तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या १२ न्यायनिवाड्यांचा संदर्भ देत युक्तिवाद केला.
मूळ फिर्यादी यांच्या वतीने ॲड. विपुल दुशिंग आणि ॲड. मयूर दोडके यांनी युक्तिवाद केला. बचाव पक्षातर्फे ॲड. हिंमतराव सूर्यवंशी यांनी बाजू मांडली. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल आणि तपास अधिकारी पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी जलतगतीने तपास करत १५ दिवसांत दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर विशेष न्यायालयाने २१ मेपासून या प्रकरणाची दैनंदिन सुनावणी सुरू केली होती.
५५ जणांची साक्ष (Nasrapur Case)
नसरापूर अत्याचार प्रकरण संवेदनशील असल्याने या प्रकरणाची सुनावणी बंद दाराआड झाली. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी पीडित बालिकेचे आई-वडील, आजी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच, तपास अधिकारी, न्यायवैद्यकीय तज्ज्ञ, डीएनए विश्लेषक यांच्यासह ५५ जणांची साक्ष नोंदवली. या खटल्यात सरकार पक्ष आणि बचाव पक्षाने अंतिम युक्तिवाद पूर्ण केला आहे. त्यानंतर आज आरोपीला फाशी देणार की जन्मठेप याचा निर्णय दिला जाणार आहे.
हेही वाचा:






