Eknath Khadse : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी लाचारी पत्करली; एकनाथ खडसेंची महाजनांवर नाव न घेता टीका

जळगाव : राज्यात आपलेच सरकार असल्याने कुठूनही कामे करता येतील. मात्र, काही जण नाशिकचे पालकमंत्रीपदे मिळावे, अशी मागणी लाचारपणे व लोचटपणे करत असल्याची टीका माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता केली.
अनेक महिन्यांपासून नाशिकला पालकमंत्रिपदाचा तिढा कायम आहे. तरी काही मंत्री (गिरीष महाजन) हे मला पालकमंत्री पद द्या, मला पालकमंत्रीपद द्या असे लाचारपणे व लोचटपणे मागणी करताहेत. या मागणीला लाचारपणाच म्हणावे लागेल. काही कारणासाठी पालकमंत्रीपदाची मागणी ते करताहेत, असं एकनाथ खडसे म्हणाले.
पुढे म्हणाले, नाशिकची धुरा कोणाकडे जाणार याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. सध्या मला पालकमंत्री करा, अशी मागणी करत लाचारी पत्करण्याचे काम काही जणांकडून होत आहे. मात्र, कशाला हवे पालकमंत्रिपद जिथे दिले तिथे काम करावे. संपूर्ण राज्यात आपलीच सत्ता आहे, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी जोरदार हल्लाबोल केला.
तसेच काहींनी विशेष कारणासाठी पालकमंत्रिपदासाठी आग्रही भूमिका मंडळी आहे. कुंभमेळ्याची अनेक कामे रखडलेली आहेत. मुळात पालकमंत्री असेल तरच कुंभमेळ्याची कामे होतात, असं काही नाही. ती जबाबदारी सरकारची आहे. प्रशासन आणि इतर मंत्री याबाबत पुढाकार घेऊन कामाला वेग देऊ शकतात त्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी देखील यावेळी एकनाथ खडसे यांनी केली.





