नाशिक | नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपाचा पेच अखेर सुटल्याची चिन्हे आहेत. भाजपने दिलेला २५ ते ३० जागांचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्वीकारल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीला शिवसेनेने ४५ जागांचा आग्रह धरला होता, मात्र मित्रपक्षाच्या प्रस्तावावर आता सहमती झाल्याचे समजते. महायुतीचा ‘नाशिक पॅटर्न’ निश्चित – नाशिक महापालिकेच्या एकूण १२२ जागांसाठी आगामी निवडणूक होत आहे. या जागावाटपा संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन आणि दादा भुसे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपने नाशिकमध्ये सर्वाधिक जागा लढवण्याचा पवित्रा घेतला असून, शिंदेंच्या शिवसेनेला २५ ते ३० जागा सोडण्याचे संकेत दिले आहेत. या प्रस्तावावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. ठाकरे-राज युतीचेही जागावाटप ठरले दुसरीकडे, ठाकरे बंधूंच्या (शिवसेना उबाठा आणि मनसे) युतीचे चित्रही स्पष्ट झाले आहे. या युतीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना ‘मोठ्या भावा’च्या भूमिकेत असेल. प्राथमिक चर्चेनुसार शिवसेना (ठाकरे गट) ७२ जागा, मनसे ५० जागा लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. या जागावाटपात माकप, वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना सामावून घेण्याबाबतही चर्चा सुरू आहे. मित्रपक्षांना जागा सोडल्यानंतर या आकड्यांमध्ये काही प्रमाणात बदल होऊ शकतो. २०-२० चे समीकरण आणि बदललेली स्थिती – २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेचे ३५, तर मनसेचे ५ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, शिवसेनेत पडलेली फूट आणि बदललेली राजकीय समीकरणे पाहता, यंदाची निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. सध्या ठाकरे गटाकडे ८, तर मनसेकडे ३ नगरसेवक उरले आहेत. अशा स्थितीत ‘ठाकरे ब्रँड’ समोर आपले वर्चस्व टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.