Nashik Election Result : नाशिकमध्ये भाजपला दणका; एकाच प्रभागात काँग्रेसचे तीन उमेदवार विजयी

Nashik Municipal Corporation Election Result : नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. आज, 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून नाशिकसह संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालांकडे लागले आहे.
विशेषतः नाशिक महापालिकेतील प्रभाग क्रमांक 13 आणि 14 मधील निकालांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रीत झाले होते. या प्रभागांतील निकालांनी निवडणूक चित्र स्पष्ट करताना काही ठिकाणी मोठे राजकीय धक्के दिल्याचे दिसून येत आहे.
प्रभाग 14 मध्ये काँग्रेसचे वर्चस्व
प्रभाग क्रमांक 14 मध्ये काँग्रेसने स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या प्रभागातून काँग्रेसचे तीन उमेदवार विजयी झाले असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका उमेदवारानेही विजय मिळवला आहे.
या प्रभागात भाजपाने उमेदवार न दिल्याचा थेट फायदा काँग्रेस व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रभाग क्रमांक 14 मधून काँग्रेसच्या नाझीया अत्तार, सामीया खान, सुफी जीन तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या जागृती गांगुर्डे यांनी विजय मिळवला आहे. या निकालामुळे नाशिकमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला असून काँग्रेससाठी हा निकाल उत्साहवर्धक ठरला आहे.





