नाशिक – नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपमधील अंतर्गत गटबाजी समोर आली असून त्याचा फटका आता उमेदवारांनाही बसत आहे. सिडको भागातील भाजपच्या दोन उमेदवारांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने तो पक्षाला धक्का मानला जात आहे. माजी नगरसेविका भाग्यश्री डेमसे आणि माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद झाला. तर त्याचवेळी सुधाकर बडगुजर, त्यांच्या पत्नी आणि मुलाचा अर्ज पात्र ठरला आहे. नाशिक भाजपमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादामुळे दोन उमेदवारांचा अर्ज बाद झाल्याची चर्चा आहे. या उमेदवारांना एबी फॉर्म देताना गोंधळ झाला होता. अर्ज बाद झाल्यानंतर मुकेश शहाणे आणि भाग्यश्री डोमसे यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. दुसरीकडे, ठाकरेंच्या सेनेतून भाजपमध्ये आलेले सुधाकर बडगुजर, त्यांच्या पत्नी हर्षा बडगुजर, पुत्र दीपक बडगुजर यांचा अर्ज मात्र वैध ठरला. सुधाकर बडगुजर, त्यांच्या पत्नी हर्षा बडगुजर, पुत्र दीपक बडगुजर हे प्रभाग 25 मधून निवडणुकीला सामोरं जाणार आहेत. त्याचवेळी दीपक बडगुजर यांचा प्रभाग 29 मधूनही उमेदवारी अर्ज पात्र ठरला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर दीपक बडगुजर हे भाजपकडून दोन प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.