NASA Selection Test: नासा, इस्रो वारीची ‘ती’ २५ नावे कोणती? भोरमधील २ हजार विद्यार्थ्यांनी दिली कठीण परीक्षा
NASA Selection Test: जिल्ह्यातील १३ तालुक्यांना मिळणार समान संधी; ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांचे अमेरिकेत जाण्याचे स्वप्न होणार साकार.

NASA Selection Test – जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे अवकाश शिक्षण देण्यासाठी ‘नासा आणि इस्रो दौरा उपक्रम’ सुरू करण्यात आला आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी निवड चाचणी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असून या अंतर्गत सन २०२६-२७ च्या दौऱ्यासाठी भोर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता सहावी ते आठवीच्या तब्बल १ हजार ९५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
तालुक्यातील एकूण १४ केंद्रांवर ही १०० गुणांची लेखी परीक्षा पार पडल्याची माहिती भोरचे गटशिक्षणाधिकारी सचिन लोखंडे यांनी दिली. तालुक्यातील रा. र. विद्यालय, शिवाजी विद्यालय भोर, तसेच किकवी, कापूरव्होळ, कामथडी, हातवे, माळेगाव, शिंदेवाडी, वेळू, आपटी, रावडी, रायरी, संगमनेर आणि भुतोंडे येथील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. यावेळी केंद्रप्रमुख रामदास पाटील, सोमनाथ कुंभार,
अनंता शिर्के, केंद्र संचालक विजय कोळी, शरद दळवी आदी उपस्थित होते. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी दीपाली चांदगुडे, संतोष निकम, शिवपुत्र कोळी, किशोर भरगुडे, मंगेश टिळेकर, संजयकुमार गजरे, शाहूराज हाक्के, शिवराज पाटील, सचिन शेळके, अमरजा देंडे, एस. आर. प्रधान, ह्रषीकेश बनसोडे आणि रोहित सोनवणे यांनी केंद्रसंचालक म्हणून काम पाहिले.
“वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित लेखी परीक्षा, एम.के.सी.एल. द्वारे ऑनलाइन परीक्षा आणि ‘आयुका’ येथे प्रत्यक्ष मुलाखत अशा तीन टप्प्यांद्वारे जिल्ह्यातून अंतिम २५ विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. या यशस्वी विद्यार्थ्यांना अमेरिकेतील ‘नासा’ अंतराळ संशोधन केंद्राला भेट देण्याची सुवर्णसंधी मिळणार असून, जिल्ह्यातील १३ ही तालुक्यांना यामध्ये समान संधी दिली जाईल.”
– सचिन लोखंडे, गटशिक्षणाधिकारी, पं. स. भोर.




