Narendra Modi : अमेरिकेच्या दबावाखाली पंतप्रधानांनी भारतीय शेतकऱ्यांचा बळी दिला; ‘या’ बड्या नेत्याची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊन एका अशा व्यापार करारावर स्वाक्षरी केली आहे, ज्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊन एका अशा व्यापार करारावर स्वाक्षरी केली आहे, ज्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. गुरुवारी केरळमधील पेरावूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना त्यांनी हा दावा केला.
या करारामुळे अमेरिकन कृषी उत्पादनांसाठी भारतीय बाजारपेठा खुल्या होणार असून, यामुळे देशाच्या कृषी क्षेत्राचा पायाच खचणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. भारत हा कृषीप्रधान देश असून शेतकरी या देशाचा पाया आहेत. मात्र, केंद्र सरकारला या पायाचा विसर पडला आहे. आयटी आणि इतर क्षेत्रांच्या मोठ्या गप्पा मारल्या जातात, पण ज्या शेतकऱ्यांमुळे आपल्या ताटात अन्न येते, त्यांनाच आज वाऱ्यावर सोडले जात आहे.
अमेरिकेतील शेती ही मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झालेली आणि विशाल आकाराची आहे, तर भारतातील शेतकरी अल्पभूधारक आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकन कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत प्रवेश देणे हे देशाच्या हिताच्या आड जाणारे कृत्य आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
गेल्या चार महिन्यांपासून भारत आणि अमेरिकेतील हा व्यापार करार कृषी क्षेत्रातील मतभेदांमुळे रखडला होता. मात्र, अमेरिकन सरकारने एपस्टीन फाईल्स मधील कथित माहितीचा धाक दाखवून पंतप्रधानांना हा करार करण्यास भाग पाडले.
या फाईल्समध्ये पंतप्रधानांशी संबंधित काही गुप्त माहिती असल्याचा दावा करत, स्वतःच्या बचावासाठी पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी ठेवण्याऐवजी भाजपची आर्थिक रचना आणि स्वतःचे संरक्षण करण्याला प्राधान्य दिले, असा आरोप गांधी यांनी केला.
संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर या विषयांवर बोलण्यापासून आपल्याला रोखले गेल्याचा दावाही त्यांनी केला. केंद्र सरकारने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, एपस्टीन प्रकरणातील संदर्भांना तथ्यहीन आणि गुन्हेगाराने केलेले बकवास विधान असे संबोधले आहे.





