Narendra Modi : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारवर बोचरी टीका केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अवमान करून तृणमूलने लोकशाहीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असून, बंगालची सुसंस्कृत जनता, आदिवासी समाज आणि देशातील महिला शक्ती या अपमानाबद्दल ममता बॅनर्जींच्या पक्षाला कधीही माफ करणार नाही, असा इशारा पंतप्रधानांनी (Narendra Modi) रविवारी दिला. दिल्ली मेट्रोच्या नवीन कॉरिडॉरचे उद्घाटन आणि ३३,५०० कोटी रुपयांच्या विकासकामांच्या पायाभरणी प्रसंगी पंतप्रधान बोलत होते. राष्ट्रपती मुर्मू यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यादरम्यान झालेल्या वादाचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, संथाळ आदिवासी समुदायाच्या पवित्र कार्यक्रमाला गालबोट लावण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. राष्ट्रपतींनी कार्यक्रमाच्या ठिकाणातील बदलाबाबत आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अनुपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर, तृणमूलने त्यांच्यावर भाजपच्या सल्ल्याने वागल्याचा आरोप केला होता. यावरून आक्रमक होत पंतप्रधानांनी या घटनेला लज्जास्पद आणि अभूतपूर्व म्हटले. आदिवासी महिला राष्ट्रपतींचा असा अनादर करणे हा केवळ एका व्यक्तीचा नाही, तर देशाच्या संविधानाचा अपमान असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.