Narendra Modi : सध्या जग अत्यंत संवेदनशील आणि तणावपूर्ण परिस्थितीतून जात असून, कोणत्याही समस्येवर लष्करी संघर्ष हा अंतिम तोडगा असू शकत नाही. युक्रेन असो वा पश्चिम आशिया, जागतिक स्थैर्यासाठी शाश्वत शांतता प्रस्थापित करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुरुवारी केले. ऑस्ट्रियाचे चॅन्सेलर ख्रिश्चन स्टॉकर यांच्याशी नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर पंतप्रधान मोदी (Narendra Modi) माध्यमांशी संवाद साधत होते. पंतप्रधान मोदी आणि चॅन्सेलर स्टॉकर यांच्यातील ही भेट अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरली. या चर्चेत दोन्ही नेत्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेवर युद्धामुळे होणाऱ्या परिणामांवर चिंता व्यक्त केली. जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करणे आणि दहशतवादाचा नायनाट करणे ही दोन्ही देशांची सामायिक बांधिलकी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. Narendra Modi चॅन्सेलर स्टॉकर यांचा हा युरोपबाहेरील पहिलाच अधिकृत दौरा असून, याद्वारे भारत आणि ऑस्ट्रिया यांच्यातील संबंध एका नव्या युगात प्रवेश करत असल्याचे मोदींनी नमूद केले. या भेटीदरम्यान भारत आणि ऑस्ट्रियामध्ये एकूण सहा महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने दोन्ही देशांतील कंपन्यांना गुंतवणुकीसाठी सुलभता मिळावी यासाठी ‘फास्ट ट्रॅक मेकॅनिझम’ची स्थापना आणि लष्करी सहकार्यासाठीच्या कराराचा समावेश आहे. भारत आणि युरोपीय महासंघातील संरक्षण भागीदारीला बळकटी देण्यासाठी लष्करी सहकार्याचा हा आराखडा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास उभय नेत्यांनी व्यक्त केला. ऑस्ट्रियाचे प्रगत तंत्रज्ञान आणि भारताची वेगाने वाढणारी बाजारपेठ यांच्या संगमातून जगभरातील पुरवठा साखळी अधिक मजबूत होईल, असेही पंतप्रधान (Narendra Modi) म्हणाले. विशेषतः रेल्वे, स्वच्छ ऊर्जा, सेमीकंडक्टर, क्वांटम आणि बायोटेक्नॉलॉजी यांसारख्या उच्च तंत्रज्ञान क्षेत्रांत ऑस्ट्रियाच्या कंपन्यांचे सहकार्य भारतासाठी मोलाचे ठरणार आहे. चॅन्सेलर स्टॉकर यांच्यासोबत आलेल्या मोठ्या व्यापारी शिष्टमंडळामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीला नवी ऊर्जा मिळेल, अशी आशा याप्रसंगी व्यक्त करण्यात आली.