Narendra Modi : “विरोधकांना पापांबद्दल शिक्षा होण्याची भीती” – पंतप्रधान मोदी
Narendra Modi – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुरूंगवारी झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना हटवण्याची तरतूद असणाऱ्या विधेयकाचे जोरदार समर्थन केले. तसेच, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विरोधकांवर टीकास्त्र सोडले. विरोधकांना केलेल्या पापांबद्दल शिक्षा होण्याची भीती वाटत आहे, अशी खिल्ली त्यांनी उडवली.
मोदी सरकारने नुकतेच घटनादुरूस्ती विधेयक लोकसभेत सादर केले. गंभीर गुन्ह्यांशी संबंधित आरोपांवरून ३० दिवसांची अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पदांवरून पायउतार व्हावे लागेल. तशी तरतूद संबंधित विधेयकामध्ये आहे.
विरोधकांनी त्या विधेयकाला कडाडून विरोध दर्शवला आहे. त्याचा संदर्भ देऊन मोदींनी कोलकत्यामधील सभेत विरोधकांवर निशाणा साधला. भ्रष्ट मुख्यमंत्री आणि थेट पंतप्रधानांना हटवण्यासाठी कायदा आणण्याचा निर्णय आम्ही घेतला.
तो कठोर कायदा आणल्यावर कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेसने विरोध सुरू केला, असे म्हणत त्यांनी नामोल्लेख टाळून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे उदाहरण दिले. तुरूंगातूनही मुख्यमंत्र्याने सरकार चालवण्याची बाब लाजिरवाणी आहे.
बंगालमधील तृणमूलचे २ मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून तुरूंगात गेले. त्यानंतरही ते पद सोडण्यास उत्सुक नव्हते. भ्रष्टाचारासाठी अटकेची कारवाई होणारे सरकारचे भाग बनून पदांवर कसे काय राहू शकतात? मी तसे होऊ देणार नाही, अशी स्पष्टोक्ती मोदींनी केली.





