Narendra Modi : मोदींना भाजपातून काढण्याचा निर्णय झाला होता, पण…; ‘या’ नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक काही दिवसांपूर्वी प्रकशित झाले. या पुस्तकात त्यांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केले आहेत. त्यांच्या या पुस्तकातील गौप्यस्फोटानंतर अनेक आरोप – प्रत्यारोप सुरु झाले. यादरम्यान ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठा आणि खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.
चंद्रकांत खैरेंनी केला ‘हा’ मोठा गौप्यस्फोट
ज्यावेळी गोधरा हत्याकांड झालं त्यावेळेस लोकसभेत खूप हंगामा झाला होता. त्यानंतर मोदी यांना भाजपामधून काढण्याचा निर्णय झाला होता. शिवसेनाप्रमुखांनी मला अहमदाबादला पाठवलं होतं. त्यावेळी मी मोदी साहेबांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की बाळासाहेब ठाकरे यांचा तुम्हाला पूर्ण आशीर्वाद आहे. तसेच शिवसेना तुमच्यासोबत आहे. तसेच त्यावेळी मला मोदी म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे माझ्यासोबत आहेत. पण माझ्याच पक्षातील लोक मला पक्षातून काढून टाकण्यासाठी प्रयत्न करत आहेत असा खुलासा खैरेंनी केला.
बाळासाहेबांमुळे मोदी वाचले…
बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मोदी यांना भाजपातून काढण्यात आलं नाही, असे खैरे म्हणाले. अटलजींना थांबावं लागलं आणि त्यांना पक्षातून काढलं नाही असं म्हणत मोदी यांना पक्षातून काढलं असतं तर ते पंतप्रधान झाले असते का? असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला. शिवसेनाप्रमुखांनी त्यांना वाचवलं आणि मदत केली. परंतु दुःख असं होतं की यांना इतकं वाचवलं असताना शिवसेना फोडण्याचं काम या लोकांनी केलं अशी भावनादेखील चंद्रकांत खैरेंनी व्यक्त केली.





